व्यापार युद्धानंतर आता करोना संकटावरून अमेरिका-चीन दरम्यान सुरू झालेल्या वाक् युद्धाने भांडवली बाजारांना पडझड नोंदविण्यास भाग पाडले आहे. जागतिक प्रमुख निर्देशांकांच्या घसरणीला साथ देताना येथील सेन्सेक्स व निफ्टीनेही सप्ताहारंभीच मोठी आपटी नोंदविली.

तब्बल २,००२.२७ अंश घसरणीसह सेन्सेक्स ३१,७१५.३५ पर्यंत तर ५६६.४० अंश घसरणीने निफ्टी ९,२९३.५० वर येऊन ठेपला.

मुंबई निर्देशांकाने महिन्यातील सर्वात मोठी आपटी आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी नोंदविली. सोमवारच्या एकाच व्यवहारातील सेन्सेक्समधील जवळपास ६ टक्के निर्देशांक आपटीने मुंबई शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना ६ लाख कोटी रुपयांचा फटका बसला.

गेल्या आठवडय़ात व्यवहार झालेल्या चारही व्यवहारात तेजी राखणारा मुंबई निर्देशांक सोमवारी सकाळच्या सत्रापासूनच घसरण नोंदवित होता. सत्रा दरम्यान त्याने ३१,६०० पर्यंतचा तळही अनुभवला.

सेन्सेक्समध्ये बँक, वित्त कंपन्या, वाहन क्षेत्रातील समभागांचा विक्री दबाव अधिक राहिला. आयसीआयसीआय बँकेचे मूल्य १० टक्क्य़ांपर्यंत घसरले. तर बजाज फायनान्स, एचडीएफसी लिमिटेड, इंडसइंड बँक, अ‍ॅक्सिस बँकेचे मूल्यही आपटले.

अखेरच्या सत्रापर्यंत आपटीप्रवास नोंदविणाऱ्या मुंबई निर्देशांकातील भारती एअरटेल व सन फार्मा या दोन कंपन्याच केवळ मूल्य तेजी नोंदवू शकल्या. फेसबुकनंतर पुन्हा हिस्सा विक्रीमुळे चर्चेत राहिलेल्या रिलायन्सचा समभाग गेल्या तीन वर्षांत सर्वात कमी तिमाही नफानोंदीमुळे २ टक्क्य़ांपर्यंत घसरला.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वित्त, बँक, पोलाद, ग्राहकपयोगी वस्तू, स्थावर मालमत्ता, वाहन निर्देशांक अधिक प्रमाणात घसरले. तर दूरसंचार, आरोग्यनिगा निर्देशांक काही प्रमाणात वाढले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप ४.२५ टक्क्य़ांपर्यंत घसरले.

दशकातील सर्वोत्तम प्रवास देशातील प्रमुख निर्देशांकांनी गेल्या सप्ताहअखेर नोंदविला होता. त्या आठवडय़ातील सलग चारही व्यवहारात तेजी नोंदविणाऱ्या भांडवली बाजारांची कामगिरी एप्रिल २००९ नंतरची सर्वोत्तम ठरली होती.

गेल्या सप्ताहअखेर सेन्सेक्स एकाच सत्रात ९९७.४६ अंशांनी झेपावत थेट ३३,७१७.६२ पर्यंत पोहोचला होता. तर ३०६.५५ अंश वाढीने निफ्टी ९,८५९.९० वर स्थिरावला होता.