जगभरात इतरत्र वातावरण नकारात्मकतेने भारलेले असताना, भारतातील गुंतवणूकदार वर्गाचा आशावाद मात्र कमालीची वेगळी छाप सोडणारा आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीबाबत सकारात्मकतेची उर्वरित जगाची सरासरी अवघी २२ टक्के असताना, भारतात हे प्रमाण ५६ टक्क्य़ांहून अधिक आहेच, तर ८१ टक्के भारतीयांना त्यांचे आर्थिक भवितव्य उज्ज्वल असल्याचे वाटते, असे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.
डीएसपी ब्लॅकरॉकने भारतीय गुंतवणूकदारांची नाडीपरीक्षा घेणाऱ्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. आपल्या आर्थिक भवितव्यावर संपूर्ण नियंत्रण आहे असे मानणाऱ्या भारतीयांची संख्याही ७५ टक्के म्हणजे ५५ टक्क्य़ांच्या जागतिक सरासरीच्या तुलनेत खूप अधिक आहे. या आघाडीवर केवळ चीनमधील गुंतवणूकदारांचे प्रमाण (८४ टक्के) भारतातील गुंतवणूकदारांपेक्षा अधिक आहे. अर्थात गत पाच वर्षांत गुंतवणुकीबाबत समभागांकडे ओढा वाढलेल्या भारतीयांचे प्रमाणही जगात सर्वाधिक ५१ टक्के इतके २०१४ पर्यंत दमदार वाढलेआहे. अर्थात ही गुंतवणूक तज्ज्ञांचा शुल्काधारित सल्ला घेऊन करण्याचा मानस असणाऱ्यांच्या संख्येतही उत्तरोतर वाढ होत असल्याचे सर्वेक्षण स्पष्ट करते.
डीएसपी ब्लॅकरॉकने ‘सिसेरो समूहा’च्या योगदानाने केलेल्या या गुंतवणूकदार सर्वेक्षणाची ही यंदाची दुसरी आवृत्ती आहे. जगातील २० प्रमुख गुंतवणूक बाजारपेठांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात तब्बल २७,५०० जणांच्या विस्तृत मुलाखती घेण्यात आल्या आहेत. २०१४ सालात पहिल्यांदाच या जागतिक सर्वेक्षणात भारताचा समावेश करण्यात आला आणि देशातील १५०० इंग्रजी भाषा जाणणाऱ्या गुंतवणूकदारांशी बोलून सर्वेक्षणाचे निष्कर्ष तयार करण्यात आले आहेत.
रोकड बाळगण्यात शहाणपण!
भारतातील बचत दर हा अर्थपंडितांच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला असताना, हे सर्वेक्षण मात्र हाती पडणाऱ्या मिळकतीतून २७ टक्क्य़ांच्या बचत आणि गुंतवणुकीची भारतीय कुटुंबांची सवय असल्याचा निष्कर्ष मांडते. हे प्रमाण युरोप व अमेरिकेपेक्षाही जास्त असल्याचा सर्वेक्षणाचा दावा आहे. पुढे परस्परविरोधी निष्कर्ष मांडतांना, जगाच्या तुलनेत भारतीयांकडून आणीबाणी प्रसंगाला तोंड देण्यासाठी रोकड बाळगण्याचे प्रमाणही खूप जास्त असल्याचेही सर्वेक्षण सांगते. अर्थ नियोजनात काही रक्कम रोख स्वरूपात गाठीला असणे अत्यावश्यक व शहाणपणाचे मानणाऱ्यांचे प्रमाण आपल्याकडे सर्वाधिक आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2015 रोजी प्रकाशित
आर्थिक उत्कर्षांच्या दृष्टीने भारतातील गुंतवणूकदार सर्वाधिक आशादायी
जगभरात इतरत्र वातावरण नकारात्मकतेने भारलेले असताना, भारतातील गुंतवणूकदार वर्गाचा आशावाद मात्र कमालीची वेगळी छाप सोडणारा आहे.
First published on: 15-01-2015 at 12:36 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investors keeps hope in indian market