सेन्सेक्स, रुपयात तेजी तर तेलाला गळती!
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या घसरत्या किमतींनी भारतात प्रमुख भांडवली व चलन बाजारात मात्र सप्ताहप्रारंभीच भर घातली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स एकाच व्यवहारात तब्बल ३८७.६९ अंश वाढत २०,६०५.०८च्या पुढे गेला, तर परकी चलन व्यवहारात अमेरिकन डॉलरच्या पुढे भारतीय चलन सलग दुसऱ्या दिवशी भक्कम बनले. दिवसाच्या उच्चांकावर स्थिरावणाऱ्या सेन्सेक्स या रूपात आशियातील दुसरा वधारता शेअर बाजार म्हणून सोमवारी नोंद केली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकातही आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी जवळपास दोन टक्क्यांची भर पडली. ११९.९० अंश वाढीसह निफ्टी ६,११५.३५ वर पोहोचला.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर एकाच दिवशी १.५ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरत असल्याचे पाहून गुंतवणूकदार भारतावरील इंधन आयात खर्च कमी होण्याच्या शक्यतेने हुरळून गेले. परिणामी त्यांनी नव्या आठवडय़ाचा प्रारंभ करताना तेल व वायूसह भांडवली वस्तू, बँक, बांधकाम या क्षेत्रातील समभागांची खरेदी सुरू केली.
यामुळे प्रमुख भांडवली बाजारातील गेल्या आठवडय़ातील घसरणीची हॅट्ट्रिक थोपवितानाच गुंतवणूकदारांची मालमत्ताही एकाच दिवसात १.०३ लाख कोटी रुपयांनी उंचावली. ती आता ६७,४२,८८१ कोटी रुपयांवर गेली आहे. कच्च्या तेलाचे कमी दर हे महागाईलाही शिथिल करतील, या गुंतवणूकदारांनी व्यक्त केलेल्या शक्यतेने खरेदीदारांनी सोमवारी सपाटा लावल्याचे मानले जाते.
सेन्सेक्समधील २७ कंपनी समभागांचे मूल्य कमालीचे वधारले. तेल व वायू निर्देशांक सर्वाधिक १.७ टक्क्यांनी वधारला, तर १३ पैकी १२ क्षेत्रीय निर्देशांकही उंचावले. सेन्सेक्समध्ये भेल (५.२%) हा समभाग सर्वाधिक आघाडीवर राहिला. तर सार्वजनिक तेल विपणन व विक्री कंपन्यांचे समभाग ६ टक्क्यांपर्यंत उंचावले. या क्षेत्रीय निर्देशांकातील केवळ कॅस्ट्रॉलचे समभाग मूल्य ०.८० टक्क्यांनी रोडावले.
चीन, हाँगकाँगवगळता आशियातील इतर शेअर बाजार वधारले. गुरुवारी होणाऱ्या महिन्याच्या वायदेपूर्तीच्या अखेरच्या दिनानिमित्त बाजारात दोन दिवस अस्थिरता राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लाच प्रकरणात व्यवस्थापकीय संचालकपदावरील व्यक्तीचे नाव येऊनही स्टेट बँकेचा समभाग सोमवारअखेर ३.६९ टक्क्यांनी वधारला. व्यवहारात ३.९९ टक्क्यांपर्यंत उचावणाऱ्या सार्वजनिक बँकेच्या समभागाला दिवसअखेर १,८०४.५५ रुपयांवर स्थिरावला. निफ्टीवर तो अधिक ४.१ टक्क्यांसह १,८०९.९० पर्यंत गेला.
तेल व वायू निर्देशाक ८,५६५.०१ १.७३%
एचपीसीएल रु. २१४.५५ ६.००%
बीपीसीएल रु. ३४७.५० ४.४५%
ओएनजीसी रु. २८८.४५ ३.७०%
आयओसी रु. २०५.७५ २.५२%
ऑइल इंडिया रु. ४५७.८० १.४४%
केर्न इंडिया रु. ३३०.९० १.२१%
गेल रु. ३३२.३५ १.२०%
पेट्रोनेट एलएनजी रु. १२४.५५ ०.९७%
रिलायन्स रु. ८५१.३५ ०.८८%
रुपयाच्या भक्कमतेला आंतरराष्ट्रीय बळ!
मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे दर शिथिल होत असतानाच डॉलरच्या तुलनेतील रुपया सोमवारी ३७ पैशांनी उंचावला. गेल्या काही सत्रांपासून सतत घसरत ६३ पर्यंत खाली येणारे भारतीय चलन आता ६२.५० पर्यंत भक्कम बनले आहे.
मुख्य तेल उत्पादक देश असणाऱ्या इराणसारख्या देशांच्या अमेरिकेबरोबरच्या अणुऊर्जा कार्यक्रमांवर येणाऱ्या र्निबध करारामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे दर कमालीने खाली उतरले. त्यातच चलनातील घसरण रोखण्यासाठी रिझव्र्ह बँकेने सुरू केलेल्या विशेष पर्यायाला ३१ डिसेंबपर्यंत मुदतवाढ मिळाल्यानेही स्थानिक चलन भक्कम बनले. विदेशी चलनाच्या रूपातील बँकेतील ठेवींच्या रूपातील अनिवासी भारतीय गुंतवणूकदारांची रक्कम याआधीच्या मुदतीपूर्वीच अपेक्षित उद्दिष्टापर्यंत पोहोचल्याने चलनात उठाव आला. ६२.६७ या भक्कमतेसह नव्या आठवडय़ाची सुरुवात करणारा रुपया सोमवारी व्यवहारात डॉलरपुढे ६२.४४ पर्यंत उंचावला. दिवसभरात ६२.७० असा तळ गाठल्यानंतर दिवसअखेर त्याने गेल्या सप्ताहाच्या तुलनेत ०.५९ टक्के भर नोंदविली.