भांडवली बाजार व चलन बाजारातील निरंतर सुरू असलेल्या पडझडीने निर्माण केलेल्या घबराटीला शांत करण्याचा प्रयत्न म्हणून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुंतवणूकदारांना भारतीय अर्थव्यवस्थेच्या ‘अंगभूत सामर्थ्यां’वर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. जागतिक प्रतिकूलतेच्या पडणाऱ्या तात्कालिक पडसादाला भुलू नका, असेही त्यांनी सांगितले.
बुडीत कर्जाच्या प्रचंड भाराने नफ्याला हानी पोहोचलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सशक्तीकरणासाठी सरकारकडून लवकरच आणखी काही पावले टाकणार असून, त्याची घोषणा लवकरच केली जाईल, असेही जेटली यांनी सांगितले.
भांडवली बाजारात सेन्सेक्सची ८०७ अंशांची गटांगळी आणि रुपयाने २९ महिन्यांपूर्वीच्या नीचांकावर लोळण गुरुवारी घेतली. त्याबाबत प्रतिक्रिया म्हणून अर्थमंत्री जेटली यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. जागतिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर देशांतर्गत अर्थवृद्धीला पोषक धोरणांचा अवलंब सरकारकडून निरंतर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
जागतिक स्तरावरील प्रमुख बाजारांमधील विक्रीचे साखळी पद्धतीने पडसाद फैलावत जाऊन, त्याचे परिणाम भारताच्या भांडवली बाजाराला भोगावे लागत आहेत, असे त्यांनी सद्य:स्थितीचे वर्णन केले.
पडझडीची कारणे ही प्रामुख्याने देशाबाहेरील घडामोडींच्या मुळाशी आहेत. अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हच्या व्याजदराबाबत अनिश्चितता, युरोपातील सावळागोंधळ आणि चीनची अर्थगती मंदावण्याचे अंदाज वगैरे जागतिक समस्या आहेत आणि त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थांनी त्यावर उत्तर शोधायचे आहे, असे जेटली यांनी सांगितले. या मंदावलेल्या जागतिक वातावरणात भारताच्या अर्थव्यवस्थेचा ७.५ टक्के व अधिक वृद्धीदर निश्चित उठून दिसणारा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jaitley to investors dont panic trust economys strength
First published on: 13-02-2016 at 05:22 IST