तकेवळ स्कूटर उत्पादन घेतले जाणारा प्रकल्प होंडाने गुजरामधील अहमदाबादनजीक स्थापन केला आहे. वार्षिक १२ लाख वाहन उत्पादन क्षमता असणाऱ्या या जगातील सर्वात मोठय़ा स्कूटरनिर्मिती प्रकल्पासाठी जपानच्या कंपनीने १,१०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
होंडाच्या प्रकल्प पायाभरणी समारंभास गुरुवारी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल व राज्याचे अर्थमंत्री सौरभ पटेल तसेच होंडाचे अध्यक्ष केइता मुरामत्सु व कंपनीच्या आशिया विभागाचे मुख्य परिचलन अधिकारी नोरिआकी अॅबे हेही उपस्थित होते.
अहमदाबादपासून ८० किलो मीटरवरील विठालपूर येथील २५० एकरवरील होंडा मोटरसायकल अॅण्ड स्कूटर्स इंडिया कंपनीचा भारतातील हा चौथा वाहन उत्पादन प्रकल्प असून येथे तीन हजार जणांना रोजगार देण्यात येणार आहे. स्कूटर उत्पादनास प्रत्यक्षात २०१५ अखेर सुरुवात होईल.
भारतात स्कूटर विक्री येत्या पाच ते दहा वर्षांत ३५ टक्क्यांनी वाढेल, असा विश्वास या वेळी मुरामत्सु यांनी व्यक्त केला. चालू आर्थिक वर्षांत कंपनी जगभरात १.८२ कोटी दुचाकी विकेल, असे नमूद करतानाच त्यात भारताचा हिस्सा २५ टक्के असेल, असेही ते म्हणाले.
नव्या प्रकल्पामुळे कंपनीच्या सध्याच्या वार्षिक ४६ लाख स्कूटरची निर्मिती वर्षभरानंतर ५८ लाख होणार आहे. होन्डा अॅक्टिव्हा, डिओ या नावाने गिअरलेस स्कूटर बनविते. कंपनीने महिन्यातील चार लाख विक्रीचा टप्पा गेल्याच महिन्यात ओलांडला.
होंडा प्रकल्पांची प्रगती :
ठिकाण हरियाणा * राजस्थान * कर्नाटक * गुजरात*
(मानेसर) (तापुकारा)    (नरसापुरम)    (विठालपूर)
क्षमता    १६ लाख  १२ लाख    १८ लाख १२ लाख
*हरियाणा, राजस्थान, कर्नाटकच्या प्रकल्पात स्कूटर व मोटरसायकल्स दोहोंची निर्मिती
होते, तर प्रस्तावित गुजरात प्रकल्प केवळ स्कूटरनिर्मितीसाठी असेल.