सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) अंत:स्थापित मूल्य (एम्बेडेड व्हॅल्यू) ५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त (६६.८२ अब्ज डॉलर) राहण्याची शक्यता आहे. तसेच ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) ठरेल, अशी माहिती सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग अर्थात ‘दीपम’चे सचिव तुहिन कांता पांडे यांनी गुरुवारी दिली.

एलआयसीच्या मूल्यांकनाच्या प्रक्रियेसाठी तिचे अंत:स्थापित मूल्य (एम्बेडेड व्हॅल्यू) महत्त्वपूर्ण असून, गुंतवणूकदार त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. एलआयसीच्या बाबतीत अंत:स्थापित मूल्यावरून कंपनीच्या भागविक्रीचे आकारमान निश्चित केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून एलआयसीच्या अंत:स्थापित मूल्याबाबत विविध अनुमान लावले जात होते. ते ५३ अब्ज डॉलर ते १५० अब्ज डॉलपर्यंत असेल असा कयास व्यक्त करण्यात आले आहेत.  मात्र प्रथमच सरकारकडून अंत:स्थापित मूल्याबाबत अधिकृतरीत्या भाष्य गुरुवारी करण्यात आले.

अंत:स्थापित मूल्य एलआयसीचे बाजार मूल्यांकन निश्चित करण्यासाठी आणि केंद्र सरकार एलआयसीच्या भागविक्रीतून किती निधी उभारू शकते हे निर्धारित करण्यासाठी मदतकारक ठरणार आहे. चालू आर्थिक वर्षांत केंद्र सरकाराला निर्गुतवणुकीच्या माध्यमातून ७८,००० कोटी रुपयांच्या सुधारित महसुलाच्या उभारणीचे अर्थसंकल्पीय लक्ष्य गाठावयाचे झाल्यास, एलआयसीमधील सरकारच्या मालकीचा काही हिस्सा खुल्या प्रारंभिक समभाग विक्रीच्या माध्यमातून विकला जाणे नितांत गरजेचा आहे. तसेच यामुळे वित्तीय तूट नियंत्रणात राखण्यास मदत होणार आहे.

कंपनीचे अंत:स्थापित मूल्य ५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून तिचे मूल्यांकन (एंटरप्राइझ व्हॅल्यू) त्यापेक्षा अधिक काही पटीत राहील, असे भाष्य तुहिन कांता पांडे यांनी केले.

सरकारचे लक्ष्य ५० ते  ९० हजार कोटींचे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तज्ज्ञांच्या मते, एलआयसीचे मूल्यांकन हे अंत:स्थापित मूल्याच्या चार पटीने अधिक राहण्याची शक्यता आहे. एलआयसी देशातील आयुर्विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असून केंद्र सरकारला एलआयसीच्या भागविक्रीतून साधारण ९० हजार कोटी रुपयांचा (१२ अब्ज डॉलर) निधी मिळण्याची आशा आहे. त्यामुळे सरकारला या आर्थिक वर्षांतील तूट भरून काढण्यात मदत होईल.