एसयूव्हीमध्ये मातब्बर असलेल्या महिंद्र अॅण्ड महिंद्रने तब्बल सहा वर्षांनंतर स्वत:च्या जोरावर दुचाकीची निर्मिती केली आहे. गीअरलेस स्कूटर प्रकारातील नवे वाहन सादर करत कंपनीने किंमत तसेच वैशिष्टय़ांमध्येही आघाडी घेतली आहे.
महिंद्र कंपनीने सोमवारी ‘गस्टो’ ही गीअरलेस स्कूटर मुंबईच्या उपनगरात प्रसारमाध्यमांसमोर सादर केली. या वेळी कंपनीच्या वाहन विभागाचे अध्यक्ष पवन गोयंका (सोबतच्या छायाचित्रात डावीकडे)व दुचाकी विभागाचे प्रमुख राजेश जेजुरीकर (उजवीकडे) हे उपस्थित होते.
महिंद्र समूहाने सहा वर्षांपूर्वी कायनेटिक कंपनी खरेदी करत दुचाकी वाहन बाजारपेठेत प्रवेश केला होता. मात्र कंपनीची ही उत्पादने पुणे येथे कायनेटिकच्या तंत्रज्ञानावरच तयार केली जात होती. यामध्ये मोजोसारख्या महागडय़ा तसेच मध्यम श्रेणीतील सेन्च्युरा; डय़ुरो, रोडिओ, फ्लाइटसारख्या गीअरलेस स्कूटरचा समावेश आहे.
११० सीसी इंजिन क्षमतेच्या गस्टोमार्फत कंपनीने या श्रेणीत प्रथमच आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे.
गस्टोची किंमतही स्पर्धकांच्या स्कूटरच्या तुलनेत कमी म्हणजेच ४३ हजार रुपये (एक्स शोरूम-नवी दिल्ली) आहे. शिवाय गीअरलेस स्कूटरमध्ये सध्या नसलेली आसन आपल्या सोयीप्रमाणे हव्या त्या उंचीवर राखण्याची यंत्रणा गस्टोमध्ये आहे.
दसऱ्याला तीन दिवस शिल्लक असताना सादर करण्यात आलेली गस्टो आता होण्डाच्या एक्टिव्हा ११०, हीरोच्या मॅस्ट्रो, टीव्हीएसच्या ज्युपिटरला टक्कर देईल. नवी गस्टो प्रति लिटर ६३ किलो मीटर धावेल, असा दावा करण्यात आला आहे. सहा विविध रंगांमध्ये ती उपलब्ध आहे.
गस्टोच्या बोधचिन्हाचे अनावरण गेल्याच आठवडय़ात करण्यात आले होते. तेव्हाच महिंद्रची नवी गीअरलेस स्कूटर नव्या वैशिष्टय़ांची असेल, असे कंपनीचे मुख्य परिचलन अधिकारी वीरेन पोपली यांनी सांगितले होते. नव्या गस्टोमध्ये सामान ठेवण्याच्या जागेची रचनाही अनोखी ठेवण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Sep 2014 रोजी प्रकाशित
महिंद्रचा स्वत:चा उमेदवार!
एसयूव्हीमध्ये मातब्बर असलेल्या महिंद्र अॅण्ड महिंद्रने तब्बल सहा वर्षांनंतर स्वत:च्या जोरावर दुचाकीची निर्मिती केली आहे. गीअरलेस स्कूटर प्रकारातील नवे वाहन सादर करत कंपनीने किंमत तसेच वैशिष्टय़ांमध्येही आघाडी घेतली आहे.

First published on: 30-09-2014 at 12:30 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahindra launched gusto 110cc scooter