नवी दिल्ली : देशाच्या निर्मिती क्षेत्राने सरलेल्या नोव्हेंबर महिन्यात लक्षणीय सक्रियता दर्शवत दमदार झेप घेतल्याचे मासिक सर्वेक्षणातून बुधवारी पुढे आले. देशातील निर्मिती क्षेत्राचा प्रवास नोंदविणाऱ्या निक्केई मार्किट इंडियाद्वारे सर्वेक्षणावर बेतलेला, निर्मिती क्षेत्रातील खरेदी व्यवस्थापकांचा कल जोखणारा (पीएमआय) निर्देशांक नोव्हेंबरमध्ये ५७.६ गुणांवर पोहोचला आहे. आधीच्या ऑक्टोबरमध्ये त्याची पातळी ५५.९ गुण अशी होती.

चालू वर्षांत फेब्रुवारीनंतर उद्योग-व्यवसायांच्या उत्पादनात निरंतर वाढ सुरू असून, वस्तू आणि सेवांच्या मागणीत सुधारणा दिसून आली. व्यावसायिक आशावाद दहा महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर नोंदला गेला आहे. नोव्हेंबरमध्ये उद्योग क्षेत्राची वाटचाल जोमदार राहिली आहे, यामुळे पुढील महिन्यांमध्ये निर्देशांकात आणाखी सुधारणा होण्याची शक्यता आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

दक्षिण आफ्रिकेत नव्याने आढळून आलेल्या करोनाच्या नव्या विषाणूने चिंतेत अधिक भर घातली आहे. याचा विपरीत परिणाम वस्तू आणि सेवांच्या महागाईवर होण्याची शक्यता आहे. बहुतांश कंपन्यांनी वाढलेल्या अतिरिक्त खर्चाचे ओझे स्वत:च्या अंगावर घेत, ग्राहकांवर अधिक महागाईचा भार पडू दिलेला नाही. मात्र नजीकच्या काळात उत्पादन घटकांची टंचाई आणि पुरवठा शृंखलेत निर्माण होणाऱ्या समस्येमुळे महागाईत भर पडण्याची शक्यता आहे, असे या निर्देशांकाच्या निमित्ताने मार्किटच्या अर्थतज्ज्ञ पॉलिआना डी लिमा यांनी स्पष्ट केले.

महागाईची चिंता

किमतीच्या आघाडीवर, उत्पादन घटकांचा पुरवठा-मागणी तोल जुळत नसल्यामुळे आणि वाढत्या वाहतूक खर्चामुळे ऑक्टोबर महिन्याबरोबरच नोव्हेंबरमध्ये महागाई अधिक राहिली. वाढत्या महागाईच्या दबावामुळे पुढील वर्षांत मागणी आणि उत्पादनात अडथळा निर्माण होऊ  शकतो अशी चिंता व्यावसायिकांना सतावत आहे. व्यावसायिकांमधील आत्मविश्वास सुमारे गेल्या दीड वर्षांतील नीचांकी पातळीवर पोचला आहे, असे लिमा यांनी निरीक्षण नोंदविले. 

देशाच्या अर्थव्यवस्थेने सरलेल्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ८.४ टक्क्य़ांचा वृद्धीदर नोंदविल्याचे मंगळवारी जाहीर केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने जगातील इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत मोठी झेप घेतली आहे.