केबल टीव्ही क्षेत्रात मुकेश यांची १३ हजार कोटींची गुंतवणूक
माध्यम व दूरसंचार अशा दोन्ही उद्योग क्षेत्रांमध्ये मोठी उलथापालथ घडवेल अशा केबल टीव्हीच्या क्षेत्रात देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे स्वारस्य स्पष्ट होत आहे. यातून विस्मृतीत गेलेला कौटुंबिक कलह आणि प्रसंगी अनेकांगाने सहकार्य व सामंजस्य पातळीवर आलेले संबंध पुन्हा ताणले जाऊन, धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्याशी त्यांची थेट स्पर्धा आणि उभा दावाही यातून रंगेल असे आढळून येत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या छत्राखाली मुकेश अंबानी यांचे किरकोळ विक्री आणि दूरसंचार क्षेत्रात हातपाय पसरण्यासाठी पडलेली पावले आता मोठय़ा झेपेसाठी सज्ज झाली आहेत. १ लाख २० हजार कोटींच्या गुंतवणुकीतून आकाराला आलेल्या रिलायन्स जिओद्वारे ४जी दूरसंचार सेवा एप्रिलपासून देशस्तरावर मूर्तरूप धारण करणे अपेक्षित आहे, तीन वर्षांत केबल टीव्ही क्षेत्रातील व्यवसायासाठी १३,००० कोटी रुपये खर्च केले जातील, असे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. स्थानिक स्तरावर विभागले गेलेल्या क्षेत्रात आर्थिक सामथ्र्य अजमावून बस्तान बसविण्याची रिलायन्सला यानिमित्ताने संधी असल्याचे मानले जाते. कंपनीच्या अधिकृत सूत्रांनी या संबंधाने प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दर्शविला.
अंबानी यांच्या दूरचित्रवाणी क्षेत्रातील या स्वारस्य हे स्थानिक स्तरावर गल्लोगल्ली पसरलेल्या छोटय़ा-मोठय़ा केबल ऑपरेटर्सना कवेत घेऊन, या क्षेत्रातील प्रस्थापितांना थेट आव्हान देण्यावर योजनेवर बेतले असल्याचे सूत्र स्पष्ट करतात. पहिल्या काही महिन्यांत १० लाख तर दुसरा टप्पा ५० लाखांचा आणि तीन वर्षांत ग्राहक पाया २ कोटींपर्यंत विस्तारण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित केले गेले असल्याचेही सूत्रे स्पष्ट करतात. केबल टीव्ही बरोबरीने ब्रॉडबॅण्ड इंटरनेट जोडणीचीही योजना आहे. देशात सध्याच्या घडीला भारतातील २ कोटी घरांमध्ये ब्रॉडबँड व अन्य प्रकारची इंटरनेट जोडणी कार्यरत आहे, तर बिनतारी इंटरनेट जोडणीच्या वर्गणीदारांची संख्या पावणेदोन लाख इतकीच आहे. उल्लेखनीय म्हणजे या अद्याप मोठा वाव असलेल्या बाजारवर्गात फैलावण्यासाठी धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्याच भाडेतत्त्वावर घेतल्या गेलेल्या ऑप्टिकल फायबर जाळ्याचा रिलायन्सकडून वापर होणार आहे. त्यामुळे हाथवे केबल, डेन नेटवर्क्स आणि सिटी केबल हे विद्यमान केबल सेवा पुरवठादार तसेच अनिल अंबानी यांच्या डी२एच तसेच उपग्रह प्रक्षेपण सेवेला अधिकाधिक मात देण्याचा प्रयत्न होणार आहे.
कौटुंबिक कलहावर सामोपचाराने उपाय म्हणून मुकेश आणि अनिल यांनी उद्योग क्षेत्रांची आपापसात वाटणी करून घेतली होती. २०१० सालात उभयतांनी समेट करून हा परस्परांशी स्पर्धा न करण्याचा कलम रद्दबातल केला. बिनतारी ब्रॉडबँड सेवेसाठी देशस्तरावर परवाना लिलावातून जिंकणारी मुकेश अंबानी यांची पहिली व एकमेव ठरली आणि पुढे ४जी तंत्रज्ञानावर जिओच्या देशस्तरावरील विस्ताराचीही योजना पुढे आली. जिओचे हे आव्हानाचा धोका लक्षात घेत अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सनेही रशियातील सिस्टेमाचा भारतातील मोबाइल व्यवसायाच्या संपादनाचा या क्षेत्रातील गत सात वर्षांतील सर्वात मोठा व्यवहार केला आणि आता एअरसेल या अन्य एका मोबाइल सेवा प्रदात्याच्या संपादनाचेही तिचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2016 रोजी प्रकाशित
अंबानी बंधूंतील व्यावसायिक शत्रुत्वाचा भडका अपरिहार्य!
केबल टीव्ही क्षेत्रात मुकेश यांची १३ हजार कोटींची गुंतवणूक
Written by लोकसत्ता टीम

First published on: 09-03-2016 at 04:09 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh ambanis 20 billion bet on tv telecoms may rekindle brothers rivalry