फेब्रुवारीअखेर गंगाजळी १७.८९ लाख कोटी
समभाग, इन्कमसारख्या पर्यायांशी निगडित फंड योजनांमधील गुंतवणूकदारांचा निधी ओघ वाढल्याने देशातील म्युच्युअल फंड उद्योगाची एकूण मालमत्ता फेब्रुवारीअखेर १७.८९ लाख कोटी रुपये अशा नव्या विक्रमावर स्वार झाली आहे.
प्रमुख ४३ फंड कंपन्यांची एकूण मालमत्ता जानेवारी २०१७ मध्ये १७.३७ लाख कोटी रुपये होती. समभाग, इन्कम फंडांमध्ये गुंतवणूकदारांनी अधिक रक्कम ओतल्याने महिन्याभरात (३०,२७३ कोटींनी) एकूण फंड मालमत्ता वाढल्याचे ‘अॅम्फी’ या फंड उद्योग संघटनेने स्पष्ट केले आहे. ‘सिप’सारख्या फंड योजनांमध्येही गुंतवणूक वाढल्याचे संघटनेने फेब्रुवारीतील आकडेवारी जाहीर करताना म्हटले आहे.
फेब्रुवारीमध्ये भर पडलेल्या एकूण फंड गुंतवणुकीपैकी १०,८६४ कोटी रुपये हे सरकारी रोखे निगडित फंडांमध्ये आहेत. समभाग व समभाग संलग्न फंड योजनांमधील गुंतवणूक ६,४६२ कोटी रुपये राहिली आहे. तर गोल्ड ईटीएफ फंडांमधील गुंतवणूक फेब्रुवारीमध्ये ४६ कोटी रुपयांनी रोडावली आहे.
देशातील फंड उद्योगाने सर्वप्रथम मे २०१४ मध्ये १० लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. २०१७ अखेपर्यंत फंड उद्योग २० लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचेल, असा विश्वास गेल्याच आठवडय़ात झालेल्या फंड कंपन्यांच्या मुंबईतील परिषदेत व्यक्त करण्यात आला होता.
अवघ्या ७ टक्के महिला निधी व्यवस्थापक
म्युच्युअल फंड योजनांचे व्यवस्थापन पाहणाऱ्या एकूण फंड व्यवस्थापकांमध्ये महिला फंड व्यवस्थापकांचे प्रमाण अवघे ७ टक्के असल्याचे फंड क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या मॉर्निगस्टारने म्हटले आहे. ४३ कंपन्यांमध्ये सध्या एकूण २६९ फंड व्यवस्थापक असून त्यापैकी १८ या महिला फंड व्यवस्थापक आहेत. या महिला फंड व्यवस्थापकांमार्फत एकूण १७.३७ लाख कोटी रुपयांपेकी २,३२० कोटी रुपयांचे निधी व्यवस्थापन होते. हे प्रमाण एकूण फंड निधीपैकी १५ टक्के आहे. हाँग काँग, सिंगापूर, फ्रान्स, स्पेन, इस्रायल आदी देशांमध्ये महिला फंड व्यवस्थापकांचे प्रमाण २० टक्क्यांपर्यंत असल्याचेही मॉर्निगस्टारने जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. भारतात कोटक महिंद्र, रिलायन्स निप्पॉन लाइफ, बिर्ला सन लाइफ, फ्रँकलिन टेम्प्लेटन, एसबीआय फंड्स मॅनेजमेंट, यूटीआय असेट मॅनेजमेंट कंपनी आदींमध्ये महिला फंड व्यवस्थापक कार्यरत आहेत.