देशातील म्युच्युअल फंड उद्योगाकडील एकूण मालमत्तेने (गंगाजळी) ही गेल्या कित्येक महिन्यांचा वाढीचा क्रम मोडून मे महिनाअखेर १.१५ टक्के अशी किंचित घट दर्शविली आहे. मुख्यत: काही स्थिर उत्पन्न गटातील योजनांमधील निर्गुतवणुकीमुळे एकूण गंगाजळी १९.०३ लाख कोटी रुपयांवर स्थिरावली आहे.

देशात सध्या कार्यरत ४२ म्युच्युअल फंड घराण्यांनी एप्रिल २०१७ अखेर १९.२६ लाख कोटी रुपये अशा विक्रमी गंगाजळीला गवसणी घातली होती. म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘अ‍ॅम्फी’ या संघटनेने चालू वर्षांत गंगाजळीने २० लाख कोटींचा टप्पा गाठला जाण्याबाबत आशावाद कायम ठेवला आहे. मे २०१४ मध्ये सर्वप्रथम म्युच्युअल फंड गंगाजळीने १० लाख कोटींचा टप्पा सर्वप्रथम पार केला होता, मात्र यंदाच्या किंचित घसरणीपायी बरोबर दोन वर्षांनी तो दुप्पट झाल्याचे मात्र अनुभवता आलेले नाही.

मनी मार्केट पर्यायांमध्ये मोडणाऱ्या काही लिक्विड फंडात गुंतवणूकदारांनी पैसा काढून घेतल्याने यंदाच्या महिन्यात एकूण गंगाजळी घसरली आहे. तथापि सरलेल्या महिन्यांत ४०,७११ कोटींची निर्गुतवणूक झाली, तर १.५१ लाख कोटी रुपयांची विविध योजनांमध्ये नव्याने गुंतवणूक ओघ आला, असे उपलब्ध आकडेवारीतून स्पष्ट होते.

रिलायन्स म्युच्युअल फंडाचे आयपीओसाठी पहिले पाऊल

मुंबई: अनिल अंबानीप्रणीत रिलायन्स एडीएजी समूहाने, म्युच्युअल फंड व्यवसाय सांभाळणाऱ्या रिलायन्स निप्पॉन लाइफ अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीच्या भांडवली बाजाराला धडक देण्याच्या प्रस्तावाला मंजुरीचा बुधवारी निर्णय जाहीर केला. देशातील कोणत्याही म्युच्युअल फंडाचा प्रारंभिक खुल्या भागविक्रीद्वारे (आयपीओ) बाजारात प्रवेश करण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल. सध्या कार्यरत ४२ फंड घराण्यांमध्ये रिलायन्स म्युच्युअल फंड तिसऱ्या क्रमांकावर असून, म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतलेल्या २.११ लाख कोटी रुपयांसह एकूण ३.६ लोख कोटी मालमत्तेचे व्यवस्थापन या फंड घराण्याकडून पाहिले जाते. मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांचे मूल्यांकन हे त्यांच्याकडील एकू्ण मालमत्तेच्या ५ टक्के मानण्यात येते. त्यामुळे रिलायन्स-निप्पॉनचे मूल्यांकन हे २०,००० कोटी रुपये गृहित धरण्यात आले असून, त्यापैकी सक्तीच्या किमान १० टक्के भागभांडवलाची खुली विक्री गृहित धरल्यास, साधारण २,००० कोटी रुपयांची भागविक्री प्रक्रिया राबविली जाईल, असे मानले जात आहे.