अर्थव्यवस्थेच्या उभारीसाठी उद्योगक्षेत्राची सारी मदार नव्या आर्थिक वर्षांवर असली तरी रोजगारनिर्मिती आणि वेतनवाढीच्या दृष्टीने मात्र २०१४ साल हे सुरुवातीपासूनच समाधानकारक राहण्याचा आशावाद त्याने व्यक्त केला गेला आहे. या वर्षांत ८ लाख नवे रोजगार निर्माण होण्यासह २० टक्क्यांपर्यंत वेतनवाढ होऊ शकते, असे कयास करण्यात येत आहे.
आर्थिक मंदीपोटी गेले अनेक महिने देशातील उद्योगाच्या दृष्टीने चिंताजनक गेले आहेत. वाढती महागाई आणि कमी मागणीमुळे उद्योगांचे उत्पादन थंडावले असतानाच कामगार कपात तसेच वेतनवाढ रोखण्याचे प्रकारही २०१३-१४ च्या सुरुवातीच्या टप्प्यात झाले.
२०१४ मध्ये मात्र रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने आमूलाग्र वाढ होण्याची शक्यता असून कर्मचाऱ्यांच्या कामगिरीनुसार २० टक्क्यांपर्यंत वेतनवाढ दिली जाऊ शकते, असे मनुष्यबळाचा शोध घेणाऱ्या ‘ग्लोबलहन्ट’चे व्यवस्थापकीय संचालक सुनील गोयल यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षांत उच्चपदीदेखील फार काही रोजगार हालचाल नोंदविली गेली नाही, असे मत व्यक्त करतानाच गोयल यांनी यंदाच्या वर्षांत कंपन्यांनाही संधी उपलब्ध होणार आहे, असे म्हटले आहे.
यंदा रोजगारवाढीला पोषक वातावरण असण्यासाठी बँक, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य, कृषी व्यवसाय, पायाभूत सुविधा, शिक्षण या क्षेत्रांत वाढ नोंदली जाण्याचे निमित्त दिले जात आहे. आर्थिक तसेच राजकीय अस्थिरताही नव्या वर्षांच्या मध्यापर्यंत संपुष्टात येईल, असे ‘मायहायरिंगक्लब.कॉम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुमार यांनी म्हटले आहे. वेतनवाढीच्या बाबतही या कालावधीत एकेरी आकडय़ापासून थेट १५ ते २० टक्क्यांपर्यंत जादा वेतन दिले जाऊ शकते, असेही नमूद करण्यात आले आहे.
न्यूयॉर्क : वाढत्या टॅब आणि स्मार्टफोनच्या भाऊगर्दीत कॉम्प्युटर मागणीला लागलेल्या ओहोटीमुळे तब्बल ३४ हजार कर्मचाऱ्यांना नव्या वर्षांत कमी करण्याची वेळ पहिल्या क्रमांकाच्या संगणक निर्मात्या ह्य़ूलेट-पॅकार्ड (एचपी) वर येऊन ठेपली आहे. कंपनीने यापूर्वी २९ हजार नोकरकपातीचे संकेत दिले होते. प्रत्यक्षात अधिक ५ हजारांना ‘नारळ’ दिला जाणार आहे. कंपनीने अमेरिकन बाजार नियामकाकडे दिलेल्या माहितीत २०१४ अखेपर्यंत तिच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी ११ टक्के म्हणजेच ३४ हजार जणांच्या कपातीची योजना आखल्याचे नमूद केले आहे. अमेरिकास्थित कंपनीचे आर्थिक वर्ष ऑक्टोबरमध्ये संपते. या कालावधीत ही कपात होईल. कपातीमुळे कंपनीची १५ टक्के बचत होईल, असाही दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, सौंदर्यप्रसाधन क्षेत्रातील रॅव्हलॉननेही चीनमधून माघार घेतानाच येथील १,१०० रोजगार कमी करण्याचे संकेत दिले आहेत. या माध्यमातून कंपनी वर्षांला १.१ कोटी डॉलरची बचत करेल.  कंपनीचे नेतृत्व लोरेन्झो डेलपनी यांच्याकडे आल्यानंतर अंतर्गत व्यवस्था रचनेत मोठे बदल झाले आहेत.