सार्वजनिक क्षेत्रातील नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेडमधील हिस्सा विक्रीस अर्थव्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने मान्यता दिली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कंपनीतील ७.६४ टक्के हिस्सा कमी करण्यात येणार आहे. ३.७४  कोटी समभाग विक्रीच्या माध्यमातून १३० कोटी उभारले जातील. या कंपनीत सरकारचा सध्या ९७.६४ टक्के हिस्सा आहे. कंपनीच्या समभागाचे मूल्य सध्या ३४.६५ रुपये आहे. शुक्रवारी मुंबई शेअर बाजारात समभागाला २.२१ टक्के अधिक भाव मिळाला. निर्गुतवणूक सचिव अध्यक्ष असलेल्या आंतर मंत्रिमंडळ गटाने गेल्याच महिन्यात कंपनीच्या निर्गुतवणुकीला मंजुरी दिली होती. निर्गुतवणुकीच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षांत ४०,००० कोटी रुपये उभारण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.
विदेशी भागभांडवल ६०% पर्यंत वाढविण्याला मंजुरी
नव्या पिढीची खासगी क्षेत्रातील येस बँकेतील विदेशी भागभांडवली सहभाग ६० टक्क्यांपर्यंत उंचावण्यास मुभा देणारा निर्णय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. यातून बँकेला विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांच्या माध्यमातून २,६५० कोटी रुपये उभारणीचा मार्गही मोकळा झाला आहे.
शगुनबाबत लवकरच निर्णय
बँकेचे माजी संस्थापक-अध्यक्ष दिवंगत अशोक कपूर यांची कन्या शगुन कपूर-गोगिया हिच्या संचालक मंडळावरील नियुक्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयाला लवकरच कळविले जाईल, अशी भूमिका येस बँकेने घेतली आहे. कपूर यांच्या पत्नी मधू कपूर यांनी तीन संचालकांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतल्यानंतर न्यायालयाने मधू-अशोक यांची कन्या शगुन हिला वारस संचालक म्हणून घ्यावे, असे बँकेला सांगितले होते.