भांडवली बाजारातील सलग सातव्या व्यवहारातील तेजीमुळे निफ्टी निर्देशांक इतिहासात प्रथमच ८ हजारावर गेला, तर सेन्सेक्सने २६,९०० नजीकचा विक्रम नोंदविला.
चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीतील ५.७ टक्के विकास दराच्या वेगावर स्वार होत २२९.४४ अंश वाढ राखत सेन्सेक्स २६,८६७.५५ वर पोहोचला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ७३.३५ अंश भर पडत निर्देशांक ८,०२७.७० पर्यंत गेला.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या इतिहासात प्रथमच ८ हजारापर्यंत पोहोचणारा निफ्टी सोमवारच्या व्यवहारात ८,०३५ पर्यंत झेपावला. निफ्टीने २५ ऑगस्ट रोजीचे ७,९५४.३५ व ७,९६८.२५ हे अनुक्रमे बंद व व्यवहार अखेरचे टप्पे मागे टाकले. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तारूढ झाल्यापासून, १२ मेपासून ७८ व्यवहारात निफ्टीने ७,००० ते ८,००० असा गतिशील प्रवास नोंदविला आहे.
सेन्सेक्सने सोमवारी व्यवहारात २६,९००.३० पर्यंत मजल मारली. याचबरोबर त्याने २८ ऑगस्टचा सत्रअखेरचा २६,६३८.११ व व्यवहारातील २६,६७४.३८ टप्पा मोडीत काढला. सेन्सेक्स गेल्या सलग सहा व्यवहारांमध्ये ३२४ अंशांची वाढ नोंदविता झाला आहे. भाजपप्रणीत नरेंद्र मोदी सरकार स्थापनेचे १०० दिवस साजरे करत असतानाच भांडवली बाजाराची तेजीची गती अधिक वृद्धिंगत होत आहे. अर्थव्यवस्था अडीच वर्षांच्या उत्तम स्थितीवर असल्याची नोंद घेत विदेशी संस्था गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात सोमवारी ओघ विस्तारला. ऑगस्टमधील वधारत्या वाहन विक्रीने या क्षेत्रातील कंपन्यांमध्येही खरेदीचा मोह दिसून आला. पोदाल क्षेत्रीय निर्देशांक सर्वाधिक २.७ टक्क्यांसह वाढ नोंदविणारा ठरला. सेन्सेक्समधील २२ कंपनी समभागांचे मूल्य उंचावले. २७५ समभागांनी त्यांचे गेल्या वर्षभरातील सर्वोत्तम मूल्य सोमवारच्या व्यवहारात नोंदविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Nifty crosses 8000 mark markets at record high
First published on: 02-09-2014 at 01:07 IST