फेडरल रिझव्‍‌र्हच्या अनिश्चिततेकडे गुंतवणूकदारांचे दुर्लक्ष; आशिया, युरोपीय बाजारांवर गुंतवणूकदारांची मदार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या सप्ताहातील सलग दोन सत्रातील घसरण नव्या आठवडय़ाच्या प्रारंभी थोपविली गेली. आशियाई तसेच युरोपातील बाजाराच्या तेजीवर येथेही वाढ नोंदली गेली. १२०.४१ अंश वाढीसह सेन्सेक्स २७,९०२.६६ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ३४.९० अंश वाढ होऊन निर्देशांक ८,६०७.४५ पर्यंत स्थिरावला.

अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हच्या संभाव्य व्याजदर वाढीच्या धास्तीने गेल्या सप्ताहातील शेवटच्या दोन्ही व्यवहारात मुंबई निर्देशांकाने घसरण नोंदविली होती. तर निफ्टीनेही त्याचा ८,६०० चा स्तर सोडला होता.

सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात काहीशा घसरणीने करणाऱ्या बाजारात नंतर खरेदीचे वातावरण निर्माण झाले. अमेरिकेतील फेडरल रिझव्‍‌र्हच्या व्याजदराबाबतची अनिश्चिततेवरील चिंता दूर सारत गुंतवणूकदारांना अखेर खरेदीला प्राधान्य दिले.

दिवसअखेर शुक्रवारच्या तुलनेत शतकाहून अधिक अंशांची वाढ नोंदविणाऱ्या सेन्सेक्सचा सोमवारच्या सत्रातील प्रवास २७,६९८.७१ ते २७,९५२.८५ दरम्यान राहिला.

मुंबई निर्देशांक गेल्या दोन व्यवहारात तब्बल २७७.६९ अंशांनी घसरला होता. नफ्यातील घसरण नोंदवूनही टाटा समूहातील टाटा मोटर्सचा समभाग सलग दुसऱ्या दिवशी वधारला. वाढ नोंदविणाऱ्या सेन्सेक्समध्येही सर्वात वर राहिला. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज, हीरो मोटोकॉर्प, आयसीआयसीआय बँक, लार्सन अँड टुब्रो, अदानी पोर्ट्स यांचेही मूल्य वाढले. सेन्सेक्समधील एकूण ३० पैकी १९ समभागांचे मूल्य वाढले.

डॉलरच्या तुलनेत घसरलेल्या रुपयाचा दबाव बाजारावर जाणवला नाही. उलट आंतरराष्ट्रीय बाजारात घसरत असलेल्या खनिज तेल दराचे स्वागत झाले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन, भांडवली वस्तू, पोलाद, तेल व वायू, सार्वजनिक उपक्रम, ग्राहकपयोगी वस्तू, बँक आदी १.४४ टक्क्य़ांपर्यंत वाढले.

दरम्यान बाजारात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांना घसरणीला सामोरे जावे लागले. विप्रो, टीसीएसचे मूल्य २.३३ टक्क्य़ांपर्यंत घसरले.

मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.४९ व ०.०९ टक्क्य़ांनी वाढले.

दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य परकी चलन विनिमय मंचावर सोमवारअखेर १२ पैशांनी घसरले.  ते ६७.१८ वर स्थिरावले.

रुपया सप्ताहखोलात

डॉलरच्या तुलनेत नव्या सप्ताहारंभी स्थानिक चलन १२ पैशांनी रोडावत ६७.१८ पर्यंत घसरले. यामुळे रुपया आता गेल्या आठवडय़ाच्या नीचांक स्तरावर येऊन ठेपला आहे. अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हकडून व्याजदर कपात होण्याच्या शक्यतेने डॉलरची मागणी परकी चलन विनिमय मंचावर वाढली. सत्रात चलन ६७.२२ पर्यंत घसरले होते.

 

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nifty goes up
First published on: 30-08-2016 at 03:37 IST