विविध कारणाने सारखे आर्थिक दंड सोसावा लागत असलेली दूरसंचार सेवा व्होडाफोनने दूरसंचार विभागाला ‘दंड आकारणारे खाते’ असे संबोधून खंत व्यक्त केली आहे. व्होडाफोनचे निवासी संचालक टी व्ही रामचंद्रन यांनी ‘अ‍ॅसोचॅम’कडून आयोजित कार्यक्रमात बोलताना, ‘आज केद्रीय दूरसंचार विभाग (डीओटी) हे ‘डीओपी’ बनले आहे. डीओपी म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट नव्हे तर डिपार्टमेंट ऑफ पेनल्टी अर्थात दंड करणारे खाते होय.’ अलीकडेच व्होडाफोनवर दूरसंचार विभागाने ५५० कोटींचा दंड थ्रीजी रोमिंग सेवेचा भंग म्हणून, तर कॉल रूटिंगचा भंग म्हणून अतिरिक्त १०४ कोटींचा दंड आकारला आहे. या पाश्र्वभूमीवर बोलताना ते म्हणाले, तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत सारे काही ठीक होते. हे खाते म्हणजे देशातील आर्थिक सुधारणांच्या मोहिमेतील अग्रेसर खाते होते. पण आज वर्तमानपत्रातील व्यापार-वृत्त वाचताना भीती वाटते. न जाणो नवीन कोणता तरी दंड आकारला जाईल.