‘पनामा’च्या रुपात आंतरराष्ट्रीय स्तरावरील आर्थिक गैरव्यवहाराची कागदपत्रे प्रसारमाध्यमातून जाहीर होताच भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या संबंधित कंपन्यांचे समभाग सोमवारी मुंबई शेअर बाजारात कमालीचे आपटले.
यामध्ये अपोलो टायर्स (-१.८१%), डीएलएफ (-१.८१%), इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स (-२.१८%), इंडियाबुल्स रिअल एस्टेट (-१.५६%) यांचा समावेश राहिला. जाहीर करण्यात आलेल्या ५०० भारतीय नावांमध्ये डीएलएफ, अपोलो टायर्स, इंडियाबुल्सचे प्रवर्तक, संचालक यांची नावे आहेत.
दरम्यान, या प्रकरणात नाव आलेल्या कंपन्यांच्या प्रवर्तकांनी आर्थिक गैरव्यवहारातील आपल्या सहभागाचा इन्कार केला आहे. इंडियाबुल्सचे समीर गेहलोत, डीएलएफचे तलवार, अपोलोचे ओंकार कंवर यांनी याबाबतच्या वृत्तात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. कंपन्यांच्या वतीने सोमवारी लगेच स्पष्टीकरण करणारे पत्रक प्रसिद्धीस दिले.