वृत्तसंस्था, नवी दिल्ली : हेलिकॉप्टर सेवा प्रदात्या पवन हंसच्या १०० टक्के व्यवस्थापकीय नियंत्रणासह मालकीच्या विक्री प्रस्तावावर ‘स्टार९ मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड’च्या २११ कोटी रुपयांच्या बोलीला मंत्रिमंडळाच्या केंद्रीय समितीने शुक्रवारी मंजुरी दिली.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचा समावेश असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक घडामोडीविषयक समितीने पवन हंसमधील सरकारच्या हिस्साविक्रीला मंजुरी दिली. दोन अपयशी प्रयत्नांनंतर, या कंपनीच्या विक्रीसाठी केंद्र सरकारने गेल्या वर्षी पुन्हा नव्याने निविदा मागविल्या होत्या. पवन हंस ही ओएनजीसीच्या तेल शोधकार्यासाठी हवाई वाहतूक सेवा पुरवते. पवन हंसमध्ये सरकारची ५१ टक्के भागभांडवली मालकी आहे, तर उर्वरित ४९ टक्के हिस्सा हा ओएनजीसीचा आहे. दोहोंकडून कंपनीतील संपूर्ण हिस्सा विकला जाणार आहे.