मुंबई : ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’च्या विक्रमी १८,३०० कोटी रुपयांच्या प्रारंभिक समभाग विक्रीला सोमवारी पहिल्या दिवशी १८ टक्के प्रतिसाद मिळाला. भांडवली बाजाराकडून सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, कंपनीने प्रारंभिक समभाग विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या ४.८३ कोटी समभागांपैकी ८८.२३ लाख समभागांसाठी बोली प्राप्त झाली.

किरकोळ गुंतवणूकदारसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या हिश्शापैकी ७८ टक्के हिश्शाला बोली लावणारे अर्ज प्राप्त झाले आहेत. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या २.६३ कोटी समभागांपैकी केवळ १६.७८ लाख समभागांसाठी बोली लागली आहे. तर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव हिश्शातून केवळ २ टक्के समभागांना तूर्त मागणी दिसून आली. कंपनीने याआधीच या माध्यमातून उभारावयाच्या १८,३०० कोटी रुपयांपैकी आघाडीच्या सुकाणू गुंतवणूकदारांकडून ८,२३५ कोटींचा निधी उभारला आहे. सोमवारपासून सुरू झालेली कंपनीची प्रारंभिक समभाग विक्रीत सहभागास इच्छुक गुंतवणूकदारांना १० नोव्हेंबपर्यंत समभागांसाठी बोली लावता येईल. कंपनीने प्रति समभाग २,०८० ते २,१५० रुपयांचा किंमत पट्टा निश्चित केला आहे. वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान सहा आणि त्यानंतर सहाच्या पटीत समभागांसाठी बोली लावून, कंपनीच्या या भागविक्रीत सहभागी होता येईल.