गेल्या सात सत्रातील घसरण भांडवली बाजारांनी मंगळवारी मोडून काढली. सव्वाशेहून अधिक अंशांनी वाढ नोंदवित सेन्सेक्स २८,३०० च्या पुढे गेला. तर निफ्टीने आठवडय़ाच्या प्रारंभी गमावलेला त्याचा ८,५५० चा पुढील स्तर पुन्हा मिळविला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१२८.२३ अंश वाढीसह मुंबई निर्देशांक २८,३५५.६२ वर पोहोचला. तर ३९.२० अंश वाढीद्वारे निफ्टी ८,५६५.५५ पर्यंत गेला. सोमवारी ८,५५० चा स्तर सोडणाऱ्या राष्ट्रीय शेअर बाजाराच्या या निर्देशांकाने मंगळवारच्या सत्रात ८,६४६.२५ पर्यंत मजल मारली.
दिल्ली विधानसभेत भाजपा नेस्तनाबूत होऊनही गुंतवणूकदारांनी खरेदीची भूमिका वठविली. याच गुंतवणूकदारांनी ‘आप’ला बहुमत मिळण्याच्या धास्तीने मुंबई निर्देशांकाला सोमवारी तब्बल ५०० अंशांनी खाली खेचले होते. मंगळवारचे व्यवहार मात्र सेन्सेक्सला दिवसभरात ४०० हून अंश झेप नोंद घेण्यास भाग पाडणारे ठरले. दिवसअखेर मात्र ही तेजी राहिली नसली तरी गेल्या सात व्यवहारातील सातत्यातील घसरण रोखली गेली.
प्रमुख निर्देशांकाची आठवडय़ातील दुसऱ्या सत्राची सुरुवातच २८,१२२.४८ च्या वरच्या टप्प्यावर झाली. दिल्ली विधानसभेचे निकाल जसे स्पष्ट होऊ लागले तसे ही भर अधिक विस्तारली. यावेळी सेन्सेक्स २८,६०० च्या पार २८,६३३.७२ पर्यंत झेपावला. दुपारनंतर त्यात नफेखोरी होताना दिसली. सेन्सेक्स त्यामुळे अगदी २८,०४४.४९ पर्यंत घसरला.
भांडवली बाजाराच्या मंगळवारच्या तेजीत देशाच्या एकूण आर्थिक वर्षांच्या आशादायक विकास दराचा हिस्सा मोठा राहिला. चालू आर्थिक वर्षांतील ७.४ टक्के या नव्या राष्ट्रीय सकल उत्पादनाच्या अंदाजाने बाजारात मंगळवारच्या सत्रात अधून मधून खरेदीचे चित्र दिसत होते. यामुळे वाहन, बँक, पोदालसारख्या निर्देशांकांमध्ये सत्रअखेरही वाढ नोंदली गेली.
सेन्सेक्समध्ये सर्वाधिक ४ टक्क्य़ांसह टाटा समूहातील टाटा मोटर्स तेजीमध्ये आघाडीवर राहिला. पाठोपाठ आयसीआयसीआय बँक समभाग ३ टक्केवाढीसह तेजीत होता. या व्यतिरिक्त टाटा स्टील, टाटा पॉवर, एचडीएफसी बँक, गेल, कोल इंडिया, इन्फोसिस, आयटीसी, लार्सन अ‍ॅन्ड टुब्रो, महिंद्र अ‍ॅन्ड मिहंद्र, स्टेट बँक, सेसा स्टरलाईट, भेलही तेजीत होते.

रुपया ६२ च्या खालीच
सलग दुसऱ्या सत्रात घसरणाऱ्या रुपयाने मंगळवारी गेल्या महिन्याभराच्या तळातील प्रवास नोंदविला. डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी २ पैशांनी रोडावत ६२.१९ पर्यंत घसरला. स्थानिक चलन आठवडय़ाच्या पहिल्या दिवशीही घसरत ६२.१७ पर्यंत खालावले होते. मंगळवारचे त्याचे सुरुवातीचे व्यवहार चलनाला ६१.९२ च्या उंचीवर घेऊन गेले. मात्र व्यवहाराच्या प्रारंभाचे चित्र दिवसअखेपर्यंत कायम राहिले नाही. परिणामी ६२.१९ या ९ जानेवारीनंतरच्या किमान पातळीवर चलनाने विराम घेतला.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Positive wave in indian share market
First published on: 11-02-2015 at 06:44 IST