भांडवली बाजारातील घसरण नव्या सप्ताहाच्या प्रारंभीदेखील कायम राहिली. सलग पाचव्या व्यवहारात घसरताना मुंबई निर्देशांक सोमवारी ५६.०६ अंशांनी रोडावत २०,६५९.५२ पर्यंत आला. नोव्हेंबरमध्ये नोंदली गेलेली सव्वा वर्षांतील सर्वोच्च महागाई आणि त्यामुळे येत्या दोन दिवसांत व्याजदर वाढीचे कोसळणारे संकट याची धास्ती घेत सेन्सेक्ससह निफ्टी दोन आठवडय़ाच्या नीचांकाला आला. १३.७० अंश नुकसानासह राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६,१५४.४० वर स्थिरावला.
गेल्याच आठवडय़ात दुहेरी आकडय़ातील (११.२४ टक्के) किरकोळ महागाई दर जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबरमधील घाऊक दरही सोमवारी स्पष्ट झाला. या कालावधीत तो ७.५२ टक्केअसा उंचावताना गेल्या १४ महिन्यांच्या वरच्या स्तराला पोहोचला. यामुळे बुधवारी जाहीर होणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या मध्य तिमाही पतधोरणात पुन्हा एकदा व्याजदर वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. मंगळवारपासूनच्या दोन दिवसांच्या अमेरिकन फेडरल रिझव्‍‌र्हच्या रोखे खरेदीच्या निर्णयाबद्दलच्या बैठकीवरही गुंतवणूकदारांची आगामी कालावधीत नजर असेलच.
एकूणच याचा विपरीत परिणाम भांडवली बाजारातील व्यवहार सुरुवातीपासूनच नकारात्मक नोंदविण्यावर झाला. तेल व वायू, वाहन उत्पादक कंपन्यांच्या समभागांची विक्री झाली.