नवी दिल्ली : देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या आठ महत्त्वपूर्ण उद्योग क्षेत्राच्या उत्पादन कामगिरीत सुधारणा झाली असून, ऑक्टोबर महिन्यात ते मागील वर्षांच्या तुलनेत ७.५ टक्क्य़ांनी वधारल्याचे सरकारकडून बुधवारी प्रसृत अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले.

वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरलेल्या ऑक्टोबरमध्ये कोळसा, नैसर्गिक वायू, रिफायनरी उत्पादने, खते, पोलाद, सिमेंट आणि वीज उद्योगांमध्ये मोठी सुधारणा दिसून आली. विशेष म्हणजे गतवर्षी ऑक्टोबर २०२० मध्ये आठ मुख्य उद्योग क्षेत्रांचे उत्पादन -०.५ टक्के (उणे) असे आक्रसले होते. तर चालू वर्षांत सप्टेंबर महिन्यात ४.५ टक्के वेग गाठला होता.

कोळसा उत्पादनात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १४.६ टक्क्य़ांनी वाढ झाली. तर पेट्रोलियम शुद्धीकरण उत्पादनात ऑक्टोबरमध्ये १४.४ टक्के वाढ नोंदवण्यात आली.

आठ महत्त्वपूर्ण उद्योग क्षेत्रांपैकी ऑक्टोबरमध्ये सिमेंट उत्पादन १४.५ टक्के, वीज २.८ टक्के, खत उत्पादन ०.०४ टक्के आणि पोलाद उत्पादन ०.९ टक्क्य़ांनी वधारले आहे. तर या कालावधीत एकमेव इंधन उत्पादनाने नकारात्मक वाढ नोंदवली. इंधन उत्पादन २.२ टक्क्य़ांनी घटले आहे.