करोना संक्रमणामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर परकीय गुंतवणूक संस्थांनी जानेवारी-मार्च तिमाहीत भारतातून ६.४ अब्ज डॉलर इतकी मोठी रक्कम काढून घेतल्याचे मॉर्निगस्टारच्या अहवालात समोर आले आहे. मागील आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत परकीय गुंतवणूक संस्थांनी ६.३ अब्ज डॉलर्सची खरेदी केली होती. जानेवारी-मार्च तिमाहीपैकी जानेवारी (१.७१ अब्ज) आणि फेब्रुवारीत (२६५ दशलक्ष) परकीय अर्थसंस्थांनी खरेदी केली होती. मार्च महिन्यात ८.४ अब्ज डॉलर्सची विक्री केली असल्याचे आकडेवारीत समोर आले आहे.

जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्था आणि वित्तीय बाजारपेठेवर करोना विषाणूबाधेमुळे होणाऱ्या परिणामाच्या अनिश्चिततेमुळे परदेशी गुंतवणूकदारांमध्ये भारतासहित अन्य उभरत्या बाजारपेठेतून मोठय़ा प्रमाणावर निधी काढून घेतला. मागील तिमाहीच्या सुरुवातीला अमेरिका आणि इराणमधील भू-राजनैतिक तणाव आणि अमेरिका-चीन व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर सावध पवित्रा घेतलेल्या परकीय अर्थसंस्थांनी वाढत्या करोना भयामुळे मार्च महिन्यात मोठय़ा प्रमाणावर निधी काढल्याचा फटका भारतासहित अन्य उभरत्या बाजारपेठांना बसला.

अर्थसंकल्प आणि रिझव्‍‌र्ह बँकेने आपल्या पतधोरणात परकीय गुंतवणूकदारांसाठी सुसंगत गुंतवणूक धोरणाचा पवित्रा कायम ठेवण्याच्या निर्णयामुळे परकीय गुंतवणूकदारांनी सुरुवातीला खरेदीचा सपाटा लावला तरी करोना महामारीचा फैलाव वाढल्यावर उभरत्या बाजारपेठांतून विक्रीचा तडाखा लावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँकेने घसरलेल्या अर्थव्यवस्थेला सावण्यासाठी कंबर कसल्याने मेमध्ये अर्थसंस्थांनी दमदार पुनरागमन केले. करोनापश्चात अर्थव्यवस्था जशी जशी रुळावर येत जाईल तशा परकीय गुंतवणूक अर्थ संस्था भारतात गुंतवणुकीचा ओघ वाढवतील, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.