मुंबई : सहनशील मर्यादेपेक्षा अधिक राहिलेला महागाई दर आणि करोनापश्चात डेल्टा विषाणूबाधेच्या संक्रमणाचे सावट पाहता, बुधवारपासून सुरू झालेल्या रिझव्‍‌र्ह बँकेच्या द्विमासिक पतधोरण आढावा बैठकीत व्याजदर आहे त्या पातळीवर कायम राखला जाण्याची शक्यता दिसून येते. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीचे निर्णय शुक्रवारी जाहीर केले जातील.

जगभरात करोनाबाधेचे नव्या रूपातील पुनरुत्थानासह, जागतिक आर्थिक दृष्टिकोनावर पुन्हा चिंता निर्माण झाली आहे. परिणामी अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्ह, युरोपियन सेंट्रल बँक आणि पीपल्स बँक ऑफ चायना यासारख्या जागतिक महत्त्वाच्या मध्यवर्ती बँकांनी त्यांच्या जुलै महिन्यातील पतधोरण आढावा बैठकांमध्ये कठोर पावित्र्याकडे कल दर्शविला आहे. अर्थव्यवस्थेत मागणीत सातत्य नसल्याबाबत चिंता व्यक्त करताना या मध्यवर्ती बँकांनी आर्थिक दृष्टिकोनाला नकारात्मक जोखीम असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, महागाई आणि रोकड सुलभता याबाबत सखोल चर्चा करून रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीचे (एमपीसी) सदस्यही निर्णय घेतील, असे विश्लेषकांचे मत आहे.