देशातील सर्वात मोठा शेअर बाजार- एनएसई (राष्ट्रीय शेअर बाजार) वर सूचिबद्ध कंपन्यांमध्ये ‘रिटेल’ अर्थात व्यक्तिगत छोटय़ा गुंतवणूकदारांचा सहभाग हा सरलेल्या मार्च २०१५ अखेर २१.३५ टक्के असा गेल्या सहा वर्षांतील उच्चांक पातळीवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरातील तेजीमुळे वधारलेल्या शेअर बाजाराबद्दल वाढलेल्या आकर्षणातून छोटय़ा गुंतवणूकदारांचा सहभाग वाढलाच, पण त्यांच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्यही आठ लाख कोटी रुपयांपल्याड वधारले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘प्राइम डेटाबेस’कडून उपलब्ध माहितीनुसार मार्च २०१४ मधील २०.९९ टक्के स्तरावरून मार्च २०१५ अखेर ‘रिटेल’ गुंतवणूकदारांचे एनएसईवरील कंपन्यांच्या समभागांमधील मालकी २१.३५ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. विशेषत: बडय़ा संस्थांगत गुंतवणूकदारांकडून दुर्लक्षित राहिलेल्या छोटय़ा कंपन्यांकडे या गुंतवणूकदारांचा ओढा असल्याचे लक्षात येते.
मार्च २०१५ अखेर विदेशी गुंतवणूकदार संस्थांची एनएसईवरील कंपन्यांमधील भाग मालकी ही ६.४४ टक्के इतकी आहे, तर देशी संस्थात्मक गुंतवणूकदारांबाबत हेच प्रमाण ५.०१ टक्के इतके आहे. छोटय़ा व्यक्तिगत गुंतवणूकदारांकडे असलेली २१.३५ टक्क्यांची मालकी ही जून २००९ नंतरचा सर्वोच्च स्तर आहे. पण वर्षभरातील बाजार तेजीमुळे त्यांच्या गुंतवणुकीचे बाजारमूल्य गेल्या वर्षांच्या तुलनेत अधिक जास्त ०.५० टक्क्यांनी वधारले आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- निफ्टीमध्ये सामील ५० कंपन्यांमधील रिटेल सहभाग मात्र अवघा ७.३१ टक्के आहे, अव्वल १०० कंपन्यांबाबतीत हेच प्रमाण ८.१९ टक्के असे आहे. एनएसईवर सध्या १,४७१ कंपन्या सूचिबद्ध आहेत. त्यापैकी ७१२ कंपन्यांमध्ये रिटेल सहभाग उंचावला, तर ७१८ कंपन्यांमध्ये तो गेल्या वर्षांच्या मार्चच्या तुलनेत घसरला आहे.

धीरुभाईंची ‘पुण्याई’ आजही उपयोगी!
शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदारांचा वावर वाढेल आणि ही गुंतवणूक सर्वतोमुखी करण्यात धीरुभाई अंबानी यांचे मोठे योगदान राहिले आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी आस्था आणि विश्वास वाढविण्यात पूर्वसुरींनी बजावलेल्या कामगिरीचा हा धाक आज त्यांच्या सुपुत्रांकडून चालविल्या जात असलेल्या कंपन्यांबाबतही कायम असल्याचे दिसून येते. साहजिकच ‘रिलायन्स’ नाममुद्रेशी संलग्न कंपन्यांमध्ये सर्वाधिक व्यक्तिगत भागधारकांचा सहभाग असल्याचे आजही दिसून येते. रिलायन्स पॉवर (३७.८२ लाख), रिलायन्स इंडस्ट्रीज (२७.४४ लाख), रिलायन्स कम्युनिकेशन्स (१६.३५ लाख), स्टेट बँक ऑफ इंडिया (११.९५ लाख), रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर (११.४८ लाख) आणि रिलायन्स कॅपिटल (१०.२५ लाख) असा छोटय़ा भागधारकांचा सर्वाधिक बोलबाला असलेल्या कंपन्या आहेत.

झुनझुनवालांच्या मत्तेत वर्षभरात ५८% वाढ
देशाच्या शेअर बाजारातील अब्जाधीश गुंतवणूकदार अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला हेच आज एनएसईवर सूचिबद्ध कंपन्यांतील सर्वात मोठे व्यक्तिगत गुंतवणूकदार आहेत. राकेश आणि त्यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांचे विविध कंपन्यांतील एकूण गुंतवणूक मूल्य मार्च २०१५ अखेर ८,३३१ कोटी रुपये झाले आहे. जे वर्षभरापूर्वीच्या मार्चअखेर ५,२६२ कोटी रुपये होते. म्हणजे प्रमुख निर्देशांक या काळात २५ टक्क्यांनी वधारले, तर झुनझुनवाला यांच्या गुंतवणुकीचा याच काळातील परतावा हा त्यापेक्षा दुपटीहून अधिक ५८ टक्के आहे. या आधीच्या वर्षांत तर त्यांच्या गुंतवणूक भांडाराने तब्बल ७३.२१ टक्क्यांचा परतावा दिला होता. भारताचे वॉरेन बफे अर्थात गुंतवणूक गुरू म्हणून त्यांना संबोधले जाते ते उगीचच नव्हे! या ‘बिग बुल’ने मोदी लाटेवर सेन्सेक्स आणि निफ्टीच्या गतिआवेगालाही कैक योजने पिछाडीवर टाकले आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retail shareholders percentage on nse over 20 percent
First published on: 27-05-2015 at 01:01 IST