नव्या वर्षांतील पहिली मोठी झेप घेणाऱ्या सेन्सेक्सने बुधवारी काहीशी विश्रांती घेत मुंबई निर्देशांकाला १०१.३३ अंशांच्या रूपाने गेल्या दोन आठवडय़ांतील मोठी घसरण नोंदविणे भाग पाडले. भांडवली बाजारात गुंतवणूकदारांनी नफेखोरी करत सेन्सेक्सला २१,०३२.८८ पर्यंत खाली आणले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही एकाच व्यवहारात ३०.९० अंश नुकसान होत प्रमुख निर्देशांक ६,२४१.८५ वर स्थिरावला. नवी दिल्लीत थेट विदेशी गुंतवणुकीला लाभलेल्या राजकीय स्पर्शाने शेअर बाजारात रिटेल क्षेत्रातील समभागांवर दबाव निर्माण झाला.
डिसेंबरमधील किरकोळ महागाई दर बडय़ा फरकाने घसरलेला पाहून मुंबई शेअर बाजारात मंगळवारी एकाच व्यवहारात तब्बल ३७६ अंश झेप घेतली गेली. (विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी या वेळी ४१३.८५ कोटी रुपयांच्या समभागांच्या खरेदी केली.) तर सलग दोन सत्रांतील वाढ मिळून ती ४२१ अंश झाली होती. बुधवारीही बाजार व्यवहारात २१,१५४.७६ पर्यंत गेला. मात्र दिवसअखेर त्यात घसरण नोंदली गेली. १०१ अंशांची ही घसरण २ जानेवारीच्या २५२.१५ अंशांनंतरची एकाच व्यवहारातील सर्वात मोठी घसरण ठरली.
पोलाद, बांधकाम क्षेत्रांतील समभाग वगळता इतर सर्वामध्ये विक्री होऊ लागली. टीसीएस, आयसीआयसीआय बँक, टाटा स्टील, सेसा स्टरलाइट यांचे समभाग सेन्सेक्सच्या घसरणीत आघाडीवर राहिले. यामुळे सेन्सेक्सही गेल्या सात आठवडय़ांच्या उच्चांकापासून माघारी फिरला आहे. डिसेंबरमधील घाऊक किंमत निर्देशांक गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या दराच्या संभाव्य वाढीच्या भीतीने गुंतवणूकदारांनी बुधवारी नफेखोरी करून घेतल्याचे मानले जात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2014 रोजी प्रकाशित
शेअर बाजारात ‘रिटेल’ घसरण ‘सेन्सेक्स’ पुन्हा २१ हजारांखाली
नव्या वर्षांतील पहिली मोठी झेप घेणाऱ्या सेन्सेक्सने बुधवारी काहीशी विश्रांती घेत मुंबई निर्देशांकाला १०१.३३ अंशांच्या रूपाने गेल्या दोन आठवडय़ांतील

First published on: 15-01-2014 at 05:52 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retail stocks fall as arvind kejriwals aap govt scraps fdi in multi brand retail