स्वत:च्या अधिकारात तसेच न्यायालयाच्या आदेशाद्वारे सहाराचे समूहाचे प्रमुख म्हणून आपली तसेच अन्य तीन संचालकांची संपत्ती जप्त करण्याचा कोणताही अधिकार भांडवल बाजार नियामक ‘सेबी’ला नाही, अशी भूमिका घेत सहाराचे सुब्रतो रॉय यांनी सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांना माध्यमाच्या व्यासपीठावर येऊन आमने-सामने मुकाबल्याचे आव्हान दिले आहे. कोणताही एक दिवस ठरवून सिन्हा यांनी एखाद्या राष्ट्रीय दूरचित्रवाहिनीवर किमान एक तासाचा अवधी द्यावा; त्याला आपण एकटय़ाने उत्तरे देऊ, असेही रॉय यांनी स्पष्ट केले आहे. सेबीने चालविलेल्या मोहिमेबद्दल रविवारी प्रमुख वर्तमान पत्रातून रॉय यांनी ‘आता खूप झाले’ अशा स्व-स्वाक्षरीसह दिलेल्या जाहिरातीतून ही आव्हानवजा प्रतिक्रिया दिली आहे. सेबीने उपस्थित केलेल्या आरोपांना उत्तर देण्याची आपली तयारी असून त्यासाठी सिन्हा यांना आपण एकटय़ाने सामोरे जाऊ, असेही रॉय यांनी म्हटले आहे. एकीकडे सेबीबरोबरच्या न्यायालयीन लढाईत हार पत्करावी लागणाऱ्या सहाराने भांडवली बाजार लवादाकडेही धाव घेतली आहे, तर दुसरीकडे रॉय यांनी जाहीर वादाचे हे आव्हान दिले आहे.