इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या सॅमसंग इंडिया कंपनीने ग्राहकांच्या गरजा ओळखून अनेक ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू सादर केल्या असून त्यात उत्तम तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे. कंपनीने २०१२-१३  या आर्थिक वर्षांत २०० अब्ज डॉलरच्या वस्तूंची विक्री केली असून नैऋत्य आशिया विभागात कंपनीने गेल्या तीन वर्षांत वाढीचा दर तिप्पट केला असून  विक्रीचा दर हा ३५ टक्के होता. घरगुती करमणूक क्षेत्रात तंत्रज्ञानाचे एक नवे जग सॅमसंगने खुले केले आहे असे सॅमसंग फोरमच्या येथे झालेल्या परिषदेत दिसून आले.
स्मार्ट टीव्ही बाजारपेठेत कंपनीने आघाडी कायम राखली असून पॅनेल टीव्ही बाजारपेठेत ३० टक्के वाटा पटकावला आहे. शाळांमधील शिक्षण, रुग्णांची तपासणी, घरातील व सार्वजनिक सुरक्षा, ग्राहक सेवा यातही खूपच आधुनिकता आणण्याच्या दिशेने सॅमसंगने अतिशय आक्रमक असे बाजारपेठ धोरण अवलबंले आहे.
सॅमसंगने एफ ८००० एलईडी टीव्ही सादर केला असून अतिशय नितळ चित्र, उत्तम रंगसंगती, टीव्ही तरंगतो आहे असा आभास निर्माण करणारा आर्क स्टँड, कमी जाडी ही त्याची वैशिष्टय़े आहेत. एफ ८००० हा स्मार्ट टीव्ही प्रकारातील असून तो ४६, ५५ व ६५ इंच आकारात उपलब्ध आहे. त्याच्या क्वाड कोअर प्रोसेसरमुळे अ‍ॅप, ऑनलाइन सेवा व टीव्ही चॅनेल्स हे सगळे वापरताना पटापट पर्याय बदलता येतात व त्याला वेळही लागत नाही. त्याला स्मार्ट टच कंट्रोल असल्याने चॅनेलचे क्रमांक व कुठल्याही अ‍ॅपमध्ये वापरायचे आकडे हे टच पॅडच्या मदतीने लिहिता येतात. त्यामुळे चॅनेल निवडताना बटने दाबावी लागत नाही. लगेच हव्या त्या चॅनेलवर जाता येते. सॅमसंग एफ ५१०० टीव्हीमध्ये कनेक्ट शेअर ट्रान्सफर सुविधा दिली आहे त्यामुळे यूएसबीच्या माध्यमातून पेन ड्राइव्ह, स्मार्टफोन, संगणक व टीव्ही यांच्यात माहितीचे आदानप्रदान करणे सोपे जाते. सॅमसंग इव्होल्यूशन किट ही अशी सुविधा तयार केली आहे की, ज्याच्या मदतीने तुम्ही स्मार्टहब अ‍ॅक्सेस करून डय़ुअल कोअर सीपीयूचे रूपांतर क्वाड कोअरमध्ये करू शकता व त्यामुळे माहिती आदान प्रदान प्रक्रिया फार वेगाने होते, काही सॅमसंग मॉडेल्सना या कीटच्या जोडणीने आधुनिक बनवता येते. सॅमसंगने ७.१ चॅनेल होम थिटएर सिस्टीमही तयार केली असून एचटी एफ ९७५० डब्ल्यू या मॉडेलचा आवाज व दृश्यक्षमता मुव्ही थिटएरपेक्षा उत्तम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. त्यात ब्लू रे डिस्कही बघता येते. स्मार्ट हबच्या सर्व सुविधा वापरणे त्यात सोपे आहे. एकाचवेळी अनेक अ‍ॅप्स त्यात वापरता येतात.
यंदाच्या प्रदर्शनात कंपनीने टीव्ही, स्मार्टफोन, पीसी, प्रिंटर, कॅमेरे, ग्राहकोपयोगी उपकरणे, वैद्यकीय साधने, एलईडीआधारित तंत्रज्ञान यातील अधिक प्रगत शक्यता प्रत्यक्षात आणून त्याचा आविष्कार घडवला. त्यामुळे ग्राहकांचा वेळ, पैसा व वीज वाचेल. मोठय़ा कंपन्या, शाळा, सरकारी कार्यालये यांना परडवतील अशाच दरात असतील असे संकेत मिळाले आहेत.