नाममात्र अस्तित्व असलेल्या शेल कंपन्यांवर सेबीचा संशय

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने नाममात्र आणि संशयास्पद अस्तित्व असलेल्या ३३१ सूचिबद्ध कंपन्यांवर संबंधित शेअर बाजारांना ताबडतोबीने कारवाईचा आदेश दिला. सोमवारी (७ ऑगस्ट) सायंकाळी उशीरा ‘सेबी’ने हा आदेश दिला असून, या ‘शेल कंपन्यां’मध्ये चालू महिन्यांत कोणत्याही व्यवहारावर र्निबध घातले आहेत. सेबीच्या या आदेशाचा प्रकाश इंडस्ट्रीज, जे. कुमार इन्फ्रा, पाश्र्वनाथ डेव्हलपर्स, पिन्कॉन स्पिरिट्ससारख्या नावाजलेल्या बडय़ा कंपन्यांनाही फटका बसणार असून, त्या संदर्भात प्रतिकूलतेने शेअर बाजारात मंगळवारी मोठी घसरण दिसून आली.

कथित वर्गीकृत पाळत यंत्रणेच्या (जीएसएम) अतीव दक्षतेच्या चौथ्या पायरीअंतर्गत  या ३३१ कंपन्यांवर देखरेख ठेवली जाणार आहे. यंत्रणेची ही चौथी पायरी म्हणजे या कंपन्यांच्या समभागात महिन्यांतून केवळ एकदाच (महिन्याच्या पहिल्या सोमवारी) व्यवहार होऊ शकतील. उल्लेखनीय म्हणजे ऑगस्ट महिन्यांतील पहिल्या सोमवारचे बाजारातील व्यवहार उरकल्यानंतर ‘सेबी’चा आदेश आल्याने ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित दिवसांमध्ये या समभागांमध्ये व्यवहारावर पूर्ण र्निबध येणार आहेत. शिवाय या कंपन्यांची स्वतंत्रपणे लेखा तपासणी तसेच त्यांच्या वित्तीय निष्कर्षांची न्यायवैद्यक तपासणीही केली जाईल.

या कंपन्यांच्या समभाग मूल्यात वरच्या दिशेने वाढ ही मागील बंद भावापेक्षा अधिक नसेल, याची खातरजमा केली जाईल. तसेच या कंपन्यांच्या समभागांच्या खरेदीदाराकडून अतिरिक्त देखरेख अनामत म्हणून एकूण व्यवहार मूल्याच्या २०० टक्के इतकी रक्कम वसूल केली जाईल. ही रक्कम संबंधित शेअर बाजारांकडे पाच महिने कालावधीसाठी राखून ठेवली जाईल.

लेखा तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, जर शेअर बाजारांना या कंपन्यांच्या स्वतंत्र अस्तित्वासंदर्भाने ठोस काही आढळून न आल्यास, त्यांच्या समभागांची बाजारातील सूचिबद्धता रद्दबातल केली जाईल. तोवर या कंपन्यांना कोणत्याही रोख्यांमध्ये व्यवहाराला मज्जाव असेल, तसेच त्यांचे डिपॉझिटरी खाते असल्यास सूचिबद्धता रद्द होईपर्यंत ते गोठविले जाईल. मुंबई शेअर बाजार – ‘बीएसई’कडे उपलब्ध तपशिलानुसार, कारवाई केल्या गेलेल्या ३३१ कंपन्यांचे सार्वजनिक भागभांडवलाचे मूल्य हे १२,००० कोटी रुपयांच्या घरात जाणारे आहे.

शेल कंपन्याम्हणजे काय?

ल्ल केवळ नाममात्र अस्तित्व असलेल्या अथवा बडय़ा कंपनीखातर गैरव्यवहार करण्याच्या युक्तीने शेअर बाजारात सूचिबद्धता मिळविणाऱ्या कंपन्यांना ‘शेल कंपन्या’ असे संबोधले जाते. यापैकी काही कंपन्यांमध्ये अभावाने व्यवहार होतात आणि भविष्यातील गैरवापरासाठी त्यांचे अस्तित्व सुप्त राखले जाते.

वर्गीकरण कसे?

संशयास्पद ३३१ कंपन्यांचे ‘शेल कंपन्या’ म्हणून वर्गीकरण हे गेल्या महिन्यांत केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाकडून करण्यात आले आणि तसे सेबीला सूचित केले गेले. निश्चलनीकरणापश्चात सरकारने स्थापित केलेल्या समितीने या कंपन्यांची यादी निश्चित केली. या ३३१ कंपन्यांमध्ये असामान्य स्वरूपाची गुंतवणूक आणि निधीचा ओघ हा काही बिगर-सूचिबद्ध कंपन्यांकडून संशयास्पदरीत्या सुरू असल्याचे आढळून आले आहे. कंपनी व्यवहार मंत्रालयाने काळ्या पैशाविरुद्ध मोहीम म्हणून शून्य व्यावसायिक क्रिया असणाऱ्या १६२,००० कंपन्यांची नोंदणी रद्दबातल करण्याची कारवाई यापूर्वीच पूर्ण केली आहे.

कंपन्या कोणकोणत्या?

शेअर बाजारांच्या वेबस्थळावर ३३१ कंपन्यांची यादी उपलब्ध आहे. कारवाई केलेल्या कंपन्यांची संख्या मोठी असून, बाजारात सूचिबद्ध कंपन्यांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण ७ टक्के इतके आहे. थेट लेखा तपासणी आणि व्यवहार र्निबधाआधी संबंधित कंपन्यांकडून खुलासे मागविणे उचित ठरले असते, असे विश्लेषकांचे म्हणणे आहे. विशेषत: या कंपन्यांच्या यादीत प्रकाश इंडस्ट्रीज, एसक्यूएस बीएफएसआय, पाश्र्वनाथ डेव्हलपर्स, पिन्कॉन स्पिरिट्स, गॅलन्ट इस्पात, जे. कुमार इन्फ्रा, प्राइम सिक्युरिटीज, द्वितीय ट्रेडिंग, आधुनिक इंडस्ट्रीज आणि व्हीबी इंडस्ट्रीज यांसारख्या दृश्यरूपात कार्यरत कंपन्याही आहेत. त्यांचे हजारो भागधारक असून, या  समभागांचे बीएसई आणि एनएसई या दोन्ही शेअर बाजारात सक्रिय रूपात नियमितपणे खरेदी-विक्री व्यवहारही होत असतात.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi for action against 331 listed companies
First published on: 09-08-2017 at 02:48 IST