चढय़ा व्याजदराचा सामना कराव्या लागणाऱ्या बांधकामनिर्मिती क्षेत्रातील कंपन्यांची प्रकल्पांसाठीची निधीची चणचण दूर करण्याचा प्रयत्न अखेर प्रत्यक्षात आला आहे. स्थावर मालमत्ता गुंतवणूक विश्वस्त (आरईआयटी) व पायाभूत गुंतवणूक विश्वस्त (इनआयटी) या दोन्ही उपाययोजनांना सेबीने मंजुरी दिली. भांडवली बाजार नियामकाच्या रविवारी झालेल्या संचालक मंडळात याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे सेबी अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी स्पष्ट केले.
या माध्यमातून येत्या तीन वर्षांत १५ अब्ज डॉलपर्यंतचा निधी उभा राहण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतच्या विश्वस्त यंत्रणांचे सूतोवाच केले होते. स्थावर मालमत्ता कंपन्यांना त्यांच्या प्रकल्पासाठीचा निधी या माध्यमातून बाजारातून उभा करता येणारी ही यंत्रणा असेल.
याद्वारे मालमत्तानिर्मितीतील कंपन्यांना त्यांच्या प्रकल्पासाठीचा निधी गुंतवणूकदारांच्या माध्यमातून उभा करता येईल. ठरावीक प्रकल्पासाठी कंपन्या असा निधी उभारून भविष्यात कंपन्यांची नोंद ही भांडवली बाजारातही करू शकतील. स्थानिक गुंतवणूक संस्था, कंपन्यांसह विमा, निवृत्त निधी तसेच भविष्य निर्वाह निधीदेखील यात गुंतविता येईल. सूचिबद्धतेसाठी विश्वस्तांची मालमत्ता ५०० कोटी रुपये असणे आवश्यक आहे. या विश्वस्तांना येत्या तीन वर्षांत भांडवली बाजारात सूचिबद्ध व्हावे लागेल.
विश्वस्त यंत्रणेमुळे स्थावर मालमत्तेत अप्रत्यक्षरीत्या गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकदारांना मिळेल. तसेच विकासकांना बँक, वित्तसंस्था यांच्यावर अधिक अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. विकासक सध्या प्रकल्प उभारणीसाठीच्या निधी उपलब्धततेसाठी मोठय़ा प्रमाणातील व्याजाधारित कर्ज घेत आहेत. विविध निमित्ताने प्रकल्प पूर्ण होण्यास अधिक कालावधी लागल्यास अशी रक्कम गुंतून पडण्याबरोबर चढे व्याजदर मात्र कायम देत असतात.
१५ ते २० अब्ज डॉलर गुंतवणूक येण्याची शक्यता केपीएमजी इंडियाचे भागीदार नीरज बन्सल यांनी वर्तविली आहे; तर सेबीच्या याच उपाययोजनांचा परिणाम सोमवारी भांडवली बाजारात बांधकाम समभाग वधारण्यावर झाल्याचे रेलिगेअर सिक्युरिटीजचे अध्यक्ष जयंत मांगलिक यांनी म्हटले आहे.
देशातील परकी गंगाजळी गेल्या काही महिन्यांपासून आटत चालली असताना विश्वस्त यंत्रणेच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राला उभारी मिळण्यासह भारतातील निधीचा ओघही वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
समभागांच्या मूल्यांचे मजले
बहुप्रतिक्षित ‘आरईआयटी’ची सेबीकडून सोमवारी स्पष्टता होताच भांडवली बाजारात या क्षेत्राशी निगडित कंपन्यांचे समभाग कमालीचे उंचावले. स्थावर मालमत्ता निर्मितीतील सूचिबद्ध कंपन्यांचे समभाग मूल्य व्यवहारात ३ टक्क्य़ांपर्यंत वधारले.
बांधकाम निर्देशांक : १,८५६.६७ (+०.९६%)
अनंत राज रु. ६२.२५ (+२.८१%)
डीएलएफ रु. १९९.२५ (+२.४२%)
ओबेरॉय रिएल्टी रु. २४४.२० (+१.१८%)
इंडियाबुल्स रिअल इस्टेट रु. ७१.९५ (+१.०५%)
यूनिटेक रु. २६.१५ (+०.७७%)
गोदरेज प्रॉपर्टीज रु. २२४.८० (+०.१८%)
आरईआयटी या संकल्पनेला सेबीच्या मंजुरीने मूर्त रुप प्राप्त झाले आहे. बांधकाम क्षेत्रातील एका अनिश्चित घडामोडीला यामुळे पूर्णविराम मिळाला आहे. यामुळे देशातील मालमत्ता क्षेत्रातील निधी उभारणीला गती येईल. याबाबत आता करविषयक अधिक स्पष्टतेची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने या विषयातही विदेशी गुंतवणूकदारही रस घेतील. नव्या निर्णयामुळे भारतासारख्या देशातील वाणिज्यिक वापरासाठीची जागा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होईल व पैकी निम्मा हिस्सा (प्रकल्प) तरी भांडवली बाजारात येत्या दोन ते तीन वर्षांत उतरेल. आमच्या अंदाजाने ही रक्कम १० ते १२ अब्ज डॉलर असेल.
अनुज पुरी, अध्यक्ष, जॉन्स लॅन्ग ला सेले, भारत.