शेअर बाजारात समभागांचे भाव कृत्रिमरित्या फुगवून फायदा उपटणाऱ्या प्रवृत्ती आणि ‘इनसायडर ट्रेडिंग’सारखी प्रकरणे यांचा छडा लावण्यासाठी गेले काही वर्षे भिजत पडलेल्या ‘कॉल डेटा रेकॉर्ड्स’च्या मागणीचे घोंगडे बाजारनियंत्रक ‘सेबी’ने पुन्हा झटकले आहे. रौप्यमहोत्सवी समारंभात शुक्रवारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेल्या भाषणाचा धागा पकडून सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा संबंधित कंपन्यांचा फोन कॉल्सचा तपशील तपासण्याचे अधिकार मिळावेत या मागणीचा पुनरूच्चार केला आहे.
इनसायडर ट्रेडिंगप्रकरणी दोषी कंपन्या आणि व्यक्तींकडून आर्थिक लाभासाठी अंतर्गत माहिती इतरांपर्यंत कशी पोहचविण्यात आली याची चौकशी करताना, प्रत्यक्ष संभाषण ऐकता येईल असा ‘फोन टॅपिंग’चा अधिकार देणे शक्य नसले तरी ‘सेबी’ला कोणा-कोणा दरम्यान कितीवेळा आणि कधी संभाषण झाले याचा तपशील सांगणारे ‘कॉल डेटा रेकॉर्ड्स’तरी उपलब्ध व्हायला हवेत, असे सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. यातून सध्या चौकशी सुरू असलेल्या प्रकरणात दोषी कंपन्या अणि व्यक्तींवर आरोप सिद्ध करण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास सिन्हा यांनी व्यक्त केला.
भांडवली बाजाराचे नियमन व देखरेखीचे सर्वाधिकार ‘सेबी’कडे आहेत, मात्र नियमभंग आणि कायद्याचे उल्लंघन झाल्यास त्यासंबंधी चौकशी करताना आवश्यक ती माहिती मिळविताना मात्र बऱ्याच अडचणी निर्माण होतात, असे सिन्हा यांनी पुढे सांगितले.
अमेरिकेसह अनेक देशातील भांडवली बाजार नियंत्रकांनी इनसायडर ट्रेडिंग व तत्सम गुन्ह्यंमध्ये अगदी सध्या गाजत असलेल्या रजत गुप्ता प्रकरणातही ‘फोन टॅपिंग’चा अधिकार वापरून योग्य तो निवाडा वेळोवेळी केला. भारतात फोन-टॅपिंगचा अधिकार हा केंद्रीय गुप्तचर विभाग आणि कर-प्रशासनासह काही मोजक्या संस्थापुरता मर्यादीत आहे. परंतु यापूर्वी कॉल डेटा रेकॉर्ड्स मिळाल्यामुळे सेबीला अनेक प्रकरणात आरोप सिद्ध करता आला असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे असा थेट अधिकार सेबीला मिळावा यासाठी अर्थमंत्रालयाकडून दूरसंचार कंपन्यांना सूचित केले जावे. – यू. के. सिन्हा, अध्यक्ष, सेबी