बँकिंग सेवा, खरेदी-व्यय तसेच तिकिटांच्या आरक्षणासाठी अलीकडे इंटरनेटचा वाढता वापर पाहता, गुंतवणुकीसाठीही या ऑनलाइन माध्यमाचा वापर वाढेल, याची खातरजमा म्युच्युअल फंडांनी अधिकाधिक योजना या पर्यायातून दाखल करून करावी, असे आवाहन या क्षेत्राची नियंत्रक ‘सेबी’ने केले.
म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीची व्याप्ती वाढण्यासाठी, विशेषत: तरुणांचे या गुंतवणूक पर्यायांमध्ये स्वारस्य वाढायचे झाल्यास इंटरनेटद्वारे या योजना त्यांच्यापर्यंत पोहचल्या पाहिजेत, अशी ‘सेबी’ची यामागील धारणा आहे. म्युच्युअल फंडांसाठी आखलेल्या दीघरेद्देशी धोरणाअंतर्गत सेबीने हे सूचित केले असून, या सेबीच्या संचालक मंडळाकडून मंजुरी मिळालेले हे धोरण लवकरच सार्वजनिक केले जाणार आहे. सर्व म्युच्युअल फंडांना यातून ऑनलाइन गुंतवणुकीची सुविधा विकसित व सर्वव्यापी करण्यावर भर द्यावा लागणार आहे. आज बहुतांश फंडाकडून तशी सोय केली गेली असली, ती अधिक प्रभावी बनणे आवश्यक असल्याचे सेबीने सूचित केले आहे. विशेषत: मोबाइल फोनद्वारे इंटरनेटशी सदासर्वदा जुळलेले असणाऱ्या तरुणाईसाठी या व्यासपीठावरून म्युच्युअल फंडांच्या नियमित खरेदीकडे वळविण्यासाठी उपाययोजना सेबीला अपेक्षित आहेत.