गेल्या सलग पाच सत्रांपासून घसरण नोंदविणाऱ्या भांडवली बाजाराने बुधवारी त्यात खंड पाडला. वस्तू व सेवा कराबाबतचे विधेयक लवकरच संसदीय अधिवेशनात मांडण्याच्या अर्थमंत्र्यांच्या संकेताने प्रमुख निर्देशांकांना उभारी मिळाली. परिणामी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २१४.१९ अंश वाढीसह २७,८९०.१३ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५१.९५ अंश वाढीसह ८,४२९.७० वर पोहोचला.
कंपन्यांच्या तिमाही निकालाबाबत नाराजी व्यक्त करत गुंतवणूकदारांनी गेल्या सलग पाच व्यवहारांत मुंबई निर्देशांकाला घसरण नोंदविण्यास भाग पाडले. या दरम्यान सेन्सेक्स १,३७० अंशांनी खाली आला आहे.
सत्रादरम्यान १५१ अंशांच्या उतरणीचा प्रवास करणारा सेन्सेक्स व्यवहारात २७,५०० च्याही खाली उतरत, २७,३८५.४८ पर्यंत आला होता. शेवटच्या तासाभरात पुन्हा खरेदीचा जोर वाढून मुंबई निर्देशांक सत्रात २७,९४७.२६ पर्यंत झेप घेतल्यानंतर दिवसअखेर तेजीसह बंद झाला. याचबरोबर निफ्टीने ८,४०० पुढील टप्पा बुधवारच्या व्यवहाराखेर गाठला. भांडवली वस्तू, औषध निर्माण, बँक समभागांमध्ये बुधवारी खरेदी नोंदली गेली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये भांडवली वस्तू १.८८ टक्के वाढीसह आघाडीवर होता. सेन्सेक्समध्ये सन फार्मा, एलअ‍ॅण्डटी, अ‍ॅक्सिस बँक, डॉ. रेड्डीज्, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, टाटा पॉवर, एचडीएफसी यांचे समभाग मूल्य वाढले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex
First published on: 23-04-2015 at 01:35 IST