मुंबई : परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात धातू, माहिती-तंत्रज्ञान आणि भांडवली वस्तू कंपन्यांच्या समभागांमध्ये चौफेर खरेदी केल्याने गुरुवारच्या सलग दुसऱ्या सत्रात ‘सेन्सेक्स’ला आणखी १५६ अंशांची भर घालता आली, तर निफ्टीने देखील आगेकूच साधत १७,३०० अंशांची पातळी ओलांडली.

सलग दुसऱ्या सत्रात तेजी कायम राखत दिवसअखेर सेन्सेक्स १५६.२३ अंशांनी वधारून ५८,२२२.१० पातळीवर बंद झाला. सकाळच्या सत्रात बाजार सुरू होताच सेन्सेक्सने ५१३.२९ अंशांची वाढ साधत ५८,५७८.७६ अंशांची उच्चांकी पातळी गाठली होती. मात्र अखेरच्या काही तासांत ठरावीक तंत्रज्ञान कंपन्या आणि बँकांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले. दुसरीकडेनिर्देशांक निफ्टीमध्ये ५७.५० अंशांची वाढ झाली आणि तो १७,३३१.८० पातळीवर स्थिरावला, निफ्टीमधील आघाडीच्या ५० कंपन्यांपैकी २७ कंपन्यांचे समभाग तेजीत व्यवहार करत स्थिरावले. जागतिक पातळीवरील संमिश्र संकेत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती पुन्हा वाढत असूनही देशांतर्गत भांडवली बाजारात सकारात्मक वातावरण कायम राहिल्याचे दिसून आले. परदेशी गुंतवणूकदारांनी मर्यादित खरेदी केल्याने तेजीला अधिक बळ मिळवून दिले. माहिती-तंत्रज्ञान, गृहनिर्माण आणि धातू कंपन्यांची दुसऱ्या तिमाहीतील कामगिरी समाधानकारक राहण्याच्या अपेक्षेने बाजाराला अधिक चालना मिळाली, असे मत जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.