जागतिक शेअर बाजारात नरमाईचे वातावरण असतानाच स्थानिक भांडवली बाजारातील आघाडीच्या कंपन्यांनीही वित्तीय निष्कर्षांतील निराशेच्या परिणामी गुंतवणूकदारांनी गुरुवारी बाजारात जोरदार विक्री केली. त्यातून सेन्सेक्स एकाच व्यवहारात तब्बल २५५ अंशांनी आपटला. गेल्या १० दिवसातील या सर्वात मोठय़ा घसरणीने निर्देशांक थेट २०,१९३.३५ वर येऊन ठेपला. तर ८२.९० अंश घसरणीमुळे ६,००१.१० वर आलेला निफ्टीनेही ३ फेब्रुवारीनंतरची मोठी घसरण दाखविली. सेन्सेक्स व निफ्टी आता अनुक्रमे चार व तीन महिन्यांच्या तळात विसावले आहेत.
गेल्या सलग दोन व्यवहारात मुंबई शेअर बाजाराने ११४ अंशांची भर नोंदविली होती. डिसेंबरमधील घसरते औद्योगिक उत्पादन दर आणि जानेवारीतील दिलासाजनक किरकोळ महागाई दर बुधवारी उशिरा जाहीर झाल्यानंतर भांडवली बाजारात सुरुवातीलाही तेजी नोंदली जात होती. फंडधारक आणि गुंतवणूकदारांकडून यावेळी विविध क्षेत्रातील समभागांना पसंती दिली जात होती.
निवडक आशियाई बाजारासह प्रमुख जागतिक शेअर बाजारातील निराशेची साथ यानंतर सिप्ला, कोल इंडियासारख्या कंपन्यांनी डिसेंबरअखेरच्या तिमाहीत कमी नफ्याने बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारावर पाणी फेरले आणि सेन्सेक्स सत्राच्या किमान स्तरावरच थांबला.
सेन्सेक्सची यापूर्वीची १९,९८३.६१ ही किमान पातळी ८ ऑक्टोबर २०१३ रोजी तर निफ्टीने २२ नोव्हेंबर २०१३ रोजी ५,९९५.४५ असा किमान स्तर राखला आहे. सेन्सेक्सने यापूर्वी ३ फेब्रुवारी रोजी व्यवहारातील ३०४.५९ अशी सर्वाधिक आपटी राखली आहे. सेन्सेक्समधील केवळ चार समभाग वधारले.