मुंबई : तेजीतील आशियाई बाजारांना प्रतिसाद देताना येथील प्रमुख निर्देशांकांनी सप्ताहाची सुरुवात तेजीसह केली. अमेरिका – चीन व्यापार चर्चा सुरू होण्याबाबतची आशा मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात उमटली. महागाई दराच्या आकडेवारीची प्रतिक्षा करत गुंतवणूकदारांनी सोमवारी सावध समभाग खरेदी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई निर्देशांकाने सोमवारच्या व्यवहारात तब्बल ४४८ अंश झेप नोंदविली. मात्र त्याची सत्रअखेर शुक्रवारच्या तुलनेत ८७.३९ अंश वाढीसह ३८,२१४.४७ पर्यंत झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३६.१० अंश वाढीने ११,३४१.१५ वर पोहोचला. सेन्सेक्समध्ये टाटा मोटर्सचा समभाग सर्वाधिक, ५.३२ टक्के वाढ नोंदविणारा ठरला. त्याचबरोबर ओएनजीसी, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, सन फार्मा, अ‍ॅक्सिस बँक, मारुती सुझुकी, बजाज ऑटो, टीसीएसचे मूल्यही वाढले. तर इन्फोसिस, बजाज फायनान्स, पॉवरग्रिड, लार्सन अँड टुब्रो, कोटक महिंद्र बँक यांचे मूल्य २.३७ टक्क्य़ांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये दूरसंचार, स्थावर मालमत्ता, वाहन, तेल व वायू, पोलाद, आरोग्यनिगा, ऊर्जा निर्देशांक २.२४ टक्क्य़ांपर्यंत वाढले. तर माहिती तंत्रज्ञान, भांडवली वस्तू निर्देशांक एक टक्क्य़ापर्यंत घसरले. मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांक अर्ध्या टक्क्य़ापर्यंत वाढले.

येथील परकीय चलन विनिमय मंचावर घसरलेल्या रुपयाचे तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती सावरल्याचे पडसादही भांडवली बाजारात उमटले.

रुपया त्रिसप्ताह तळात

डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी त्याच्या गेल्या तीन आठवडय़ाच्या तळात स्थिरावला. सप्ताहारंभीच येथील परकीय चलन विनिमय मंचावर स्थानिक चलन २१ पैशांनी रोडावत ७१.२३ वर येऊन ठेपले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex ends 87 points higher zws
First published on: 15-10-2019 at 02:45 IST