मुंब्ई : ब्रिटन आणि युरोपीयन युनियन दरम्यान ब्रेग्झिट व्यवहारावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्वागत आशियाई बाजारासह येथील भांडवली बाजारातही झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलग पाचव्या सत्रात निर्देशांक झेप नोंदविताना सेन्सेक्स ३९ हजारांवर पोहोचला. तर एकाच सत्रात शतकाहून अधिक निर्देशांक वाढीने निफ्टी ११,६०० नजीक स्थिरावला.

गुरुवारच्या एकाच व्यवहारात मुंबई निर्देशांक ४५३.०७ अंश वाढीसह ३९,०५२.०६ वर तर निफ्टी १२२.३५ अंश वाढीने ११,५८६.३५ पर्यंत स्थिरावला.

आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार भारतातील गुंतवणुकीसाठी उत्सुक असून केंद्र सरकारतर्फे येत्या कालावधीत अधिक आर्थिक उपाययोजना जाहीर केल्या जातील, या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या संकेतानेही येथील भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी समभाग खरेदीसाठी स्फुरण चढले.

सेन्सेक्समध्ये येस बँक तब्बल १५.१९ टक्क्यांसह प्रमुख निर्देशांकात अग्रेसर राहिला. त्याचबरोबर टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, स्टेट बँक, बजाज ऑटो, एशियन पेंट्स, अ‍ॅक्सिस बँक, टाटा स्टील, मारुती सुझुकी आदी जवळपास १० टक्क्यांपर्यंत वाढले. तर एचसीएल टेक, वेदांता, पॉवरग्रिड, कोटक महिंद्र बँक, इन्फोसिस, ओएनजीसी, टेक महिंद्र, लार्सन अँड टुब्रो, एचडीएफसी बँक एक टक्क्यापर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये वाहन, बँक, वित्त, ऊर्जा, पोलाद, आरोग्यनिगा आदी जवळपास ३ टक्क्यांपर्यंत वाढले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप १.७७ टक्क्यांपर्यंत वाढले.

आशियाई बाजारात शांघाय, हाँगकाँग, सेऊल, टोक्यो येथील निर्देशांक वाढले.

डॉलरच्या तुलनेत वाढलेला रुपया आणि आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलातील दरउतार यांचीही दखल येथील भांडवली बाजारात घेतली गेली.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex ends above 39000 zws
First published on: 18-10-2019 at 02:13 IST