सलग चौथ्या सत्रात घसरण नोंदविताना प्रमुख भांडवली बाजारांनी नव्या सप्ताहाची सुरुवात नकारात्मक स्थितीत केली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६९.०६ अंशांचे नुकसान सोसत सोमवारी २८,१९२.०२ तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २० अंश घसरणीसह ८,५५०.९० वर थांबला.
प्रमुख भांडवली बाजार आता गेल्या तब्बल नऊ आठवडय़ाच्या तळात विसावले आहेत. सेन्सेक्सचा १६ जानेवारीनंतरची ही किमान पातळी आहे. सलग चार व्यवहारात घसरणाऱ्या मुंबई निर्देशांकाचे नुकसान यामुळे ५४४ अंश झाले आहे.
माहिती तंत्रज्ञान, ग्राहकपयोगी वस्तू, बँक, तेल व वायू, भांडवली वस्तू आदी क्षेत्रातील समभागांवर आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी दबाव निर्माण झाला. परिणामी सेन्सेक्समधील भेल, रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, विप्रो, स्टेट बँक, मारुती सुझुकी, एचडीएफसी बँक, सन फार्मा, टाटा पॉवर यांना कमी भाव मिळाला. सर्वाधिक नुकसान माहिती तंत्रज्ञान निर्देशांकाला एक टक्का घसरण अनुभवावी लागली. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांकही एक टक्क्य़ांपर्यंत घसरले होते.
दिवसाची सुरुवात तेजीसह करणारा मुंबई निर्देशांक सत्रात २८,३८५ पर्यंत उंचावला होता. मात्र गुंतवणूकदारांनी नफेखोरी साधत त्याला व्यवहारात २८,१६३.९० पर्यंत खाली आणले. तर सत्रातील सुरुवातीच्या तेजीमुळे ८,६०० पार करत सत्रात ८,६०८.३५ पर्यंत झेपावलेला निफ्टी दिवसभरात ८,५४०.५५ पर्यंत खालीही आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Web Title: Sensex ends below
First published on: 24-03-2015 at 07:36 IST