मुंबई : जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेत आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे सलग चार दिवसांच्या तेजी रथाला लगाम लागला. बुधवारच्या सत्रात माहिती तंत्रज्ञान, बँकिंग आणि ग्राहकपयोगी वस्तू कंपन्यांच्या समभागात गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्समध्ये १५० अंशांची घसरण झाली.

बुधवारच्या अस्थिर सत्रात सेन्सेक्स १५०.४८ अंशांच्या घसरणीसह ५३,०२६.९७ पातळीवर बंद झाला. दिवसभरातील सत्रात त्याने ५२,६१२.६८ या दिवसभरातील नीचांकी पातळीला स्पर्श केला.  तर निफ्टीमध्ये ५१.१० अंशांची घसरण झाली आणि तो १५,७९९ पातळीवर स्थिरावला.

अनियंत्रित आणि वाढत्या महागाईमुळे ग्राहकांच्या आत्मविश्वासात झपाटय़ाने कमकुवत बनत चालला आहे. दुसरीकडे तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियाला अल्पावधीत तेलाचा पुरवठा वाढविणे शक्य नसून महागाईसंबंधाने दिलासा दृष्टिपथात नाही. जागतिक पातळीवर प्रमुख भांडवली बाजारात पडझडीचे सत्र कायम असल्याने देशांतर्गत गुंतवणूकदारांना दुहेरी मार सहन करावा लागत आहे. मात्र देशांतर्गत पातळीवर गुंतवणूकदारांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग, धातू आणि तेल-वायू कंपन्यांच्या समभागात खरेदीचा जोर लावल्याने बाजार काहीसा सावरला, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.