शतकी घसरणीने सेन्सेक्स २५,५०० वर

भांडवली बाजारातील निराशा नव्या सप्ताहाच्या प्रारंभीदेखील कायम राहिली.

मुंबई निर्देशांक सोमवारी २५,५०० नजीक येऊन ठेपला.

निर्देशांकाची सलग चौथी आपटी; बाजाराची सप्ताहारंभीही निराशाच
भांडवली बाजारातील निराशा नव्या सप्ताहाच्या प्रारंभीदेखील कायम राहिली. शतकी निर्देशांक घसरणीने मुंबई निर्देशांक सोमवारी २५,५०० नजीक येऊन ठेपला. १०८ अंश नुकसानासह सेन्सेक्स २५,५३०.११ वर थांबला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकात १६.५० अंश घसरण झाल्याने निफ्टी ७,७६५.४० पर्यंत स्थिरावला. प्रमुख निर्देशांकाची ही सलग चौथी आपटी राहिली आहे.
जागतिक बाजारातील अस्वस्थता तसेच भारतात वस्तू व सेवा कर विधेयकासाठी सुचविण्यात आलेली करवाढ यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण राहिले. डॉलरच्या तुलनेत रुपयातील व्यवहारातील घसरण आणि अमेरिकी फेडरल रिझव्‍‌र्हची २००८ नंतरची संभाव्य पहिली व्याजदर वाढ याचेही सावट बाजारात आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी अनुभवले गेले.
सोमवारच्या व्यवहारात सुरुवातीच्या तेजीमुळे सेन्सेक्स २५,७८५.५३ पर्यंत झेपावला होता. मात्र यानंतर तो लगेचच नकारात्मक प्रवास करता झाला.
सेन्सेक्समधील १६ कंपन्यांचे समभाग घसरले. तर हीरो मोटोकॉपचा प्रवास स्थिर राहिला. घसरलेल्या समभागांमध्ये कोल इंडिया, ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रिज, मारुती सुझुकी, बजाज ऑटो, स्टेट बँक, डॉ. रेड्डीज, वेदांता यांना अधिक फटका बसला.
तर सुरवातीच्या व्यवहारातील तेजीमुळे सन फार्मा, हिंदुस्थान यूनिलिव्हर, ल्युपिन, टाटा स्टील, एचडीएफसी, गेल, विप्रो हे दिवसअखेरही वाढते राहिले. मुंबई शेअर बाजारात क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये ऊर्जा, पोलाद, तेल व वायू, वाहन, आरोग्यनिगा हे निर्देशांक घसरणीत सर्वात पुढे होते.
गेल्या चार व्यवहारातील सेन्सेक्समधील घसरण ६३९.३० पर्यंत विस्तारली गेली आहे. यामुळे मुंबई निर्देशांकाचा सोमवारचा तळ हा १८ नोव्हेंबरनंतरचा किमान स्तर राहिला आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने गेल्याच आठवडय़ात ७,९०० व ७,८०० चाही स्तर सोडला. सोमवारी निर्देशांक ७,८२५.४० पर्यंत उंचावल्यानंतर दिवसअखेर ७,७६५.४० पर्यंत घसरला.

सिगारेट उत्पादक कंपन्यांचा मूल्यऱ्हास
सिगारेट, तंबाखू तसेच पान मसालेसारख्या उत्पादनांवर ४० टक्क्य़ांपर्यंतच्या कराची शिफारस वस्तू व सेवा करबाबतच्या समितीने केल्यानंतर भांडवली बाजारात संबंधिक उत्पादक कंपन्यांचे समभाग ६.५ टक्क्य़ांपर्यंत घसरले.
आयटीसी                    रु. ३१३.५५            (-६.५७%)
गॉडफ्रे फिलिप्स          रु. १,४९०.२५         (-४.९०%)
व्हीएसटी इंडस्ट्रिज     रु. १,६४३.१०         (-२.८५%)
गोल्डन टोबॅको           रु. ४४.३५               (-०.५६%)

२०१६ मध्ये बाजाराला १५ दिवस सुटी
२६ जानेवारी, मंगळवार गणराज्य दिन
७ मार्च, सोमवार महाशिवरात्री
२४ मार्च, गुरुवार होळी
२५ मार्च, शुक्रवार गुड फ्रायडे
१४ एप्रिल, गुरुवार डॉ. आंबेडकर जयंती
१५ एप्रिल, शुक्रवार राम नवमी
१९ एप्रिल, मंगळवार महाविर जयंती
६ जुलै, बुधवार रमजान ईद
१५ ऑगस्ट, सोमवार स्वातंत्र्य दिन
५ सप्टेंबर, सोमवार गणेश चतुर्थी
१३ सप्टेंबर, मंगळवार बकरी ईद
११ ऑक्टोबर, मंगळवार दसरा
१२ ऑक्टोबर, बुधवार मोहरम
३१ ऑक्टोबर, सोमवार बलिप्रतिपदा
१४ नोव्हेंबर, सोमवार गुरुनानक जयंती

पैकी सात सुटय़ा या शनिवार तसेच रविवारला जोडून येत असल्याने त्या दरम्यान सलग चार दिवस भांडवली बाजार बंद राहणार आहे. या व्यतिरिक्त बाजाराला नियमितपणे असलेल्या चार सुट्टय़ा या २०१६ मध्ये ऐन रविवारी आल्या आहेत. यामध्ये नव्या संवस्तराच्या (२०७३) मुहूर्ताच्या सौद्यातील लक्ष्मीपूजनाचा (३० ऑक्टोबर) तसेच ख्रिसमसचाही समावेश आहे.

महिनाअखेर बँका सलग चार दिवस बंद
२०१५ ची मावळती नजीक आली असताना महिनाअखेर सलग सुट्टय़ा येऊ घातल्या आहेत. परिणामी याचा फटका बँक क्षेत्राला बसणार आहे. यामध्ये २४ व २५ डिसेंबर रोजी अनुक्रमे ईद व ख्रिसमसची सुटी आहे. तर लागू येणाऱ्या २६ डिसेंबर रोजी चौथ्या शनिवारनिमित्त व २७ डिसेंबर रोजी रविवार असल्याने बँका बंद असतील.

सोने – चांदी दरांमध्ये लक्षणीय वाढ
मुंबई : खरेदीदारांमध्ये अचानक आलेल्या उत्साहामुळे मौल्यवान धातूचे दर सोमवारी पुन्हा एकदा उंचावले. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत असलेले सोने तसेच चांदीचे दर सप्ताहारंभी लग्नाचा मौसम सुरू होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर वाढले. स्टॅण्डर्ड सोन्याचा तोळ्याचा दर दिवसअखेर मुंबई सराफा बाजारात तब्बल ४१० रुपयांनी वाढून २५,५५० रुपयांपुढे गेला. तर शुद्ध सोनेही याच प्रमाणात वाढून १० ग्रॅमकरिता २५,७०० रुपयेपर्यंत गेले. चांदीचा किलोचा भाव ७८० रुपयांनी वाढून ३५,३८० रुपये झाला. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने गेल्या तीन सप्ताहाच्या तळातून आता बाहेर आले आहे.

रुपयातील घसरण कायम
मुंबई : डॉलरच्या तुलनेतील रुपयाची नरमाई सप्ताहारंभीही कायम राहिली. स्थानिक चलन सोमवारी ४ पैशांनी रोडावत ६६.७३ पर्यंत खाली आले. गेल्या सप्ताहअखेरच्या व्यवहारात रुपयाने ६७ ला स्पर्श करताना धास्ती वाढविली होती. त्याचा हा दोन वर्षांचा तळ होता. गेल्या चार व्यवहारात रुपया २४ पैशांनी कमकुवत झाल आहे. अमेरिकी चलनात फेडरल रिझव्‍‌र्हच्या संभाव्य व्याजदर वाढीने भक्कमता अनुभवली जात आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sensex falls for fourth day ends 108 points down nifty ends at

ताज्या बातम्या