मुंबई : चीनच्या अर्थव्यवस्थेतील मंदावलेपणाचे आशियाई बाजारांमध्ये संमिश्र प्रतिबिंब तर युरोपीय बाजारातील सकारात्मक सुरुवातीची दखल घेत, स्थानिक भांडवली बाजारात सोमवारी सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांक वाढ नोंदवून बंद झाले.

ठरावीक पट्टय़ात व्यवहार सीमित राहिलेल्या सत्रात, ३० समभागांच्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ८५.८८ अंशांनी अर्थात ०.१४ टक्क्यांनी वाढून ६१,३०८.९१ वर बंद झाला. सेन्सेक्समधील १९ समभाग वाढले तर ११ समभाग घसरले. बरोबरीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ५२.३५ अंश (०.२९ टक्के) भर घालून, दिवसअखेर १८,३०९.१० या पातळीवर स्थिरावला. या निर्देशांकातील ३४ समभाग वधारले, तर १६ घसरणीत राहिले. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेल या निर्देशांकातील वजनदार स्थान असणाऱ्या समभागांमधील मूल्यवाढ दोन्ही निर्देशांकांच्या वाढीत प्रमुख योगदान राहिले.

करोना निर्बंध आणि स्थावर मालमत्ताविषयक समस्यांमुळे मागणीवर परिणाम झाल्यामुळे चीनच्या चौथ्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) ४ टक्क्यांनी वाढल्याचा, तर संपूर्ण वर्षांतील अर्थव्यवस्थेतील वाढ ८.१ टक्क्यांवर सीमित राहिल्याचा अहवाल आला. याला प्रतिसाद म्हणून आशियाई बाजारांचे वर्तन हे संमिश्र स्वरूपाचे होते. मात्र दुपारच्या सत्रात, युरोपीय बाजारातील सकारात्मकतेचे अनुकरण करीत आपल्या बाजारात तेजीवाल्यांना थोडा जोर दाखविला. परिणामी निर्देशांकांनी सकारात्मक क्षेत्रात व्यवहार सुरू केला. विदेशी गुंतवणूकदारांनीही मागील तीन महिन्यांतील निर्गुतवणुकीचा क्रम उलटवत सुरू केलेल्या खरेदीने सुपरिणाम साधला, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सव्‍‌र्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदविले.

व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.२३ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.६१ टक्क्यांनी असे प्रमुख निर्देशांकांपेक्षा सरस प्रमाणात वाढले.