सेन्सेक्स महिन्याच्या तळात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भांडवली बाजारातील घसरण सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिली. सुरुवातीच्या तेजीनंतर प्रमुख निर्देशांकांनी मंगळवारी घसरण नोंदविली.

७०.५८ अंश घसरणीमुळे सेन्सेक्स २८,२२४ या महिन्याच्या तळात विसावला. तर १६.६५ अंश घसरणीमुळे निफ्टी ८,७०० च्या काठावर, ८,७०६.४० पर्यंत घसरला.

गेल्या दोन व्यवहारात मुंबई निर्देशांक ४७८.८५ अंशांनी खाली आला आहे. मंगळवारचे बाजाराचे व्यवहार काहीसे तेजीने सुरू झाले. मात्र सत्रातील शेवटच्या तासाभरात विक्रीचा दबाव निर्माण होत प्रमुख निर्देशांकाने सोमवारच्या घसरणीत आणखी भर टाकली.

चालू आठवडय़ात होत असलेल्या प्रमुख तेल उत्पादक देशांची बैठक, रिझव्‍‌र्ह बँकेचे येत्या आठवडय़ात होणारे व्याजदर निश्चितीचे पतधोरण तसेच गुरुवारी संपणाऱ्या महिन्यातील वायदापूर्तीच्या व्यवहारावर गुंतवणूकदारांची नजर आहे.

सेन्सेक्समधील १८ समभागांचे मूल्य घसरले. यात अदानी पोर्ट्स, भारतीय एअरटेल, लार्सन अँड टुब्रो, अ‍ॅक्सिस बँक, ओएनजीसी, गेल, स्टेट बँक यांचा समावेश राहिला. तर भांडवली वस्तू, तेल व वायू, पोलाद, सार्वजनिक उपक्रम आदी १.१२ टक्क्यांपर्यंत घसरले.

सत्रादरम्यानच्या तेजीमुळे माहिती तंत्रज्ञान, आरोग्यनिगा, ग्राहकोपयोगी वस्तू आदी निर्देशांक दिवसअखेरही तेजीत राहिले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांक मात्र ०.१३ टक्क्यांपर्यंत वाढले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex goes down
First published on: 28-09-2016 at 04:46 IST