शुक्रवारी सलग दुसरा दिवस भांडवली बाजारासाठी कमाईचा राहिला. दमदार सुरुवातीनंतर दिवस सरताना निर्देशांक केवळ नाममात्र वाढ नोंदवून बंद झाले असले तरी, बाजारात मजबूत कामगिरी असलेल्या समभागांच्या खरेदीला जोर चढत असल्याचे स्पष्टपणे आढळून आले. उल्लेखनीय म्हणजे शुक्रवारच्या सकारात्मकतेसह, सरलेला सप्ताह बाजारासाठी चांगला राहिला. सलग चार सप्ताह तुटीचे गेल्यानंतर बाजाराने साप्ताहिक कमाई केली. शुक्रवारचे व्यवहार थंडावले तेव्हा सेन्सेक्स २६.५७ अंशांच्या वाढीसह २५,८६८ वर तर निफ्टी ५० ने १३.८० अंशांची कमाई करून ७,८५६.५५ या पातळीवर विश्राम घेतला. सकाळच्या व्यवहारात दोन्ही निर्देशांकांनी अनुक्रमे २६ हजार आणि ७,९०० या महत्त्वाच्या पातळ्या ओलांडल्या होत्या.