मुंबई निर्देशांक २८ हजार पार; निफ्टी ८,६०० पल्याड
नव्या आर्थिक वर्षांपासून लागू होणाऱ्या वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) उद्योगक्षेत्राला अनुकूल असलेला दर निश्चित केला जाण्याच्या आशेवर झुलणाऱ्या सेन्सेक्सने मंगळवारी थेट ५२१ अंशांची झेप घेतली. पाच महिन्यांतील सर्वोत्तम निर्देशांकवाढ नोंदवून सेन्सेक्स यामुळे पुन्हा २८,००० वर विराजमान झाला.
वस्तू व सेवा कराच्या रूपात आर्थिक सुधारणांचा आणखी एक टप्पा भारतीय अर्थव्यवस्थेत येऊ घातल्याची भावना मनी बाळगत विदेशी गुंतवणूकदारांनीही आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात जोरदार खरेदी केली. परिणामी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीलाही त्याचा यापूर्वीचा ८,६०० चा स्तर गाठता आला.
५२०.९१ अंश वाढीसह सेन्सेक्स २८,०५०.८८ पर्यंत तर १५७.५० अंश वाढीने निफ्टी ८,६५९.८० वर पोहोचला. दोन्ही निर्देशांकांत १.८५ ते १.८९ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदली गेली. सेन्सेक्सची २५ मेनंतरही सत्रातील यंदाची सर्वोत्तम झेप ठरली. यापूर्वीची त्याची व्यवहारवाढ ५७५.७० अंश नोंदली गेली आहे.
२०१७-१८ पासून लागू होणाऱ्या वस्तू व सेवा कराचा दर निश्चित करणारी केंद्रिय अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठक मंगळवारी उशिरा संपली. तत्पूर्वीच अर्थसुधारणेच्या दिशेने पडलेल्या पावलाचे बाजारात स्वागत झाले. कंपन्यांचे दुसऱ्या तिमाही वित्तीय निकाल, महागाई कमी होत असल्याने व्याजदर कमी होण्याची आशा, डॉलरच्या तुलनेत भक्कम होऊ पाहणारा रुपया याचीही दखलही बाजाराने घेतली. आशियाई बाजारांनीही तेजी नोंदविली. तर युरोपीय बाजारांची सुरुवातही वाढीसह झाली.
चालू सप्ताहाची सुरुवात जवळपास दीडशे अंश घसरणीने करणाऱ्या मुंबई निर्देशांकांचा मंगळवारचा प्रवास तेजीसह झाला. सुरुवातीच्या टप्प्यात २०० अंशांची वाढ नोंदली जात होती. ती विस्तारत २८ हजार पल्याड गेली. सोमवारच्या तुलनेतील ही वाढ तब्बल ५०० अंशांनी अधिक होती. व्यवहारात मुंबई निर्देशांक २८,०६४.३९ पर्यंत झेपावला. निफ्टीची मजल व्यवहारात ८,६५९.८० ची होती. सेन्सेक्ससह निफ्टीनेही गेल्या पाच महिन्यातील सर्वोत्तम व्यवहारवाढ मंगळवारी राखली.
बँक क्षेत्रातील समभागांचे मूल्य तुलनेत अधिक वाढले. यामध्ये आयसीआयसीआय बँक सर्वाधिक, ४.५८ टक्क्यांसह आघाडीवर राहिला. त्याचबरोबर सेन्सेक्समधील अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक यांचे समभाग मूल्य २.५९ टक्क्यांपर्यंत वाढले. २.३७ टक्के वाढीसह क्षेत्रीय निर्देशांकात बँक निर्देशांक हा सर्वात पुढे राहिला.
अन्य वाढलेल्या निर्देशांकांमध्ये भांडवली वस्तू, माहिती तंत्रज्ञान, पोलाद आदी २ टक्क्यांपर्यंत उंचावले. सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ ओएनजीसी व एशियन पेंट्स हे समभाग घसरणीच्या यादीत राहिले. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे १.८९ व १.३० टक्क्यांनी वाढले.
गेल्या दोन आठवडय़ांत बाजाराने काहीशी संथ निर्देशांक वाटचाल केली आहे. वस्तू व सेवा कर परिषदेच्या बैठकीतून काहीतरी ठोस निर्णय निघेल, या आशेवर गुंतवणूकदारांमध्ये उत्साह संचारल्याचे आपण मंगळवारच्या भांडवली बाजारातील व्यवहारातून दिसले.
विनोद नायर, प्रमुख संशोधक, जिओजित बीएनपी पारिबा फायनान्शियल सव्र्हिसेस