थेट विदेशी गुंतवणूकविषयक नियम सुटसुटीत करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे भांडवली बाजारात गुरुवारी जोरदार स्वागत झाले. सत्रात जवळपास अडीचशे अंश भर घालत सेन्सेक्स २८,५०० नजीक पोहोचला. तर निफ्टीने ८,६०० पुढील अनोखा टप्पा आठवडय़ाच्या अखेरच्या टप्प्यात नोंदविला.
२४७.८३ अंश वाढीसह सेन्सेक्स २८,४४६.१२ वर तर ८४.२५ अंश वाढीसह निफ्टी ८,६६०८.०५ वर पोहोचला. निर्देशांकाची ही तिमाही झेप आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेत विदेशी गुंतवणूक येण्याचा मार्ग सुलभ करणारा निर्णय मोदी सरकारने गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीच्या रूपात घेतला. यामुळे २८ हजारांपुढे गेलेला सेन्सेक्स गुरुवारी २८,५०० नजीक पोहोचला.
थेट विदेशी गुंतवणूक अटी सुलभ केल्याने विशेषत: खासगी क्षेत्रातील बँकांना अधिक लाभ होणार आहे. यामुळे या क्षेत्रातील सूचिबद्ध बँक समभागांचे मूल्यही गुरुवारी वाढले. त्याचबरोबर निवडक सार्वजनिक बँकांनाही मागणी राहिली.
चालू आठवडय़ात सलग दोन दिवस मुंबई निर्देशांकाने २८ हजारांचा स्तर अनुभवला. मात्र बुधवारच्या सत्रात तो प्रथमच २८ हजार पार करता झाला. २८,२०० पर्यंत तो पोहोचला होता. गुरुवारच्या व्यवहाराची सुरुवात मुंबई निर्देशांकाने २८,२५९.७० या तेजीसह केली. सत्रात त्याने २८,४७८.४३ या २८,५०० नजीक झेप घेतली. तर दिवसअखेर तो या टप्प्यानजीक स्थिरावला.
मुंबई निर्देशांकाने २८,५०० पुढील प्रवास यापूर्वी १६ एप्रिल रोजी नोंदविला होता. तर याच दिवशी ८,७०६.७० हा निफ्टीचा यापूर्वीचा सर्वोच्च स्तर राखला गेला. निफ्टीच्या तेजीत बँकांबरोबरच तेल व वायू क्षेत्रातील समभागांचा सिंहाचा वाटा राहिला.
मुंबई निर्देशांकातील २३ कंपन्यांचे समभाग मूल्य वाढले. त्यातही भेल, एचडीएफसी, सिप्ला, डॉ. रेड्डीज, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, हिंदाल्को हे आघाडीवर राहिले. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये २.०६ टक्के वाढीसह ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक सर्वात वर राहिला.
अ‍ॅक्सिस बँक रु. ६०८.७५ (+४.१४%)
कोटक बँक रु. ७४१.३० (+४.०३%)
येस बँक रु. ८२९.५० (+३.११%)
एचडीएफसी बँक रु. १,११३.३५ (+१.५४%)
आयसीआयसीआय बँक रु. ३१७.२५ (+०.८३%)
इंडसइंड बँक रु. ९३२.०५ (+०.६१%)
गुरुवारची मुंबई शेअर बाजारातील कामगिरी