मुंबई : जागतिक पातळीवर ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन विषाणूमुळे चिंतेचे वातावरण असले तरी देशांतर्गत पातळीवर अर्थव्यवस्थेने सरलेल्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ८.४ टक्कय़ांचा वृद्धिदर नोंदविल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास दुणावला आहे. परिणामी बुधवारी तेजीवाल्यांनी समभाग खरेदीचा सपाटा लावला.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ६१९.१२ अंशांनी वधारून ५७,६८४.७९ पातळीवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने पुन्हा १७,००० अंशांची पातळी गाठण्यात यश मिळविले. हा निर्देशांक १८३.७० अंशांनी वधारून १७,१६६.९० पातळीवर स्थिरावला.

सेन्सेक्समध्ये इंडसइंड बँकेचा समभाग ५.७३ टक्कय़ांच्या वाढीसह आघाडीवर राहिला. त्यापाठोपाठ अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक, टेक महिंद्र, मारुती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग तेजीत होते. दुसरीकडे, डॉ. रेड्डीज, अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, भारती एअरटेल, टायटन आणि कोटक बँकेचे समभाग प्रत्येकी १.५८ टक्कय़ांपर्यंत घसरले.

मंगळवारी जागतिक बाजारातील तीव्र घसरणीच्या छायेनंतर, बुधवारी भारतीय भांडवली बाजाराने कलाटणी घेत तेजी दर्शविली. करोनाच्या दुसऱ्या लाटेतून सावरत देशाच्या अर्थव्यवस्थेने सरलेल्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत ८.४ टक्कय़ांचा वृद्धीदर नोंदविल्याने बाजारात पुन्हा तेजीचे वारे संचारले, असे निरीक्षण ‘जिओजित फायनान्शिअल सव्‍‌र्हिसेस’चे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले. अमेरिकेत मात्र ‘फेड’कडून नजीकच्या कालावधीत रोखे खरेदी कार्यक्रम गुंडाळण्यासह व्याजदर वाढीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. शिवाय ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे तेथे गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला आहे.