मोदी सरकारचा शनिवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पोतडीतून बाहेर पडणाऱ्या तरतुदींबाबत आशा-अपेक्षांच्या धुमाऱ्यांचे प्रतिबिंब शुक्रवारी भांडवली बाजारात निर्देशांकांनी घेतलेल्या मोठय़ा मुसंडीत दिसून आले. सेन्सेक्सने गत सहा आठवडय़ांतील सर्वात मोठी ४७३ अंशांच्या झेप घेऊन तेजीवाले अर्थसंकल्पाच्या तोंडावर पुन्हा सक्रिय झाल्याचे दर्शविले. कारण गुरुवारी रेल्वे अर्थसंकल्पाने केलेल्या अपेक्षाभंग आणि त्या आधीही तेजीला खंड पाडणाऱ्या नफारूपी विक्रीने बाजारात घसरण दिसून आली होती. शनिवारी सुट्टी असतानाही, अर्थसंकल्पानिमित्ताने विशेष व्यवहारासाठी दोन्ही राष्ट्रीय शेअर बाजार खुले राहणार असून, अपेक्षेप्रमाणे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडून घोषणानाद ऐकू आल्यास बाजारात त्याचे समर्पक पडसाद उमटण्याची अपेक्षा करता येईल.गुरुवारी मालवाहतूक दरात वाढ ही महागाई दराच्या भडक्याला फुंकर घालणारी ठरेल या भीतीने सेन्सेक्सने २९ हजारांची, तर निफ्टीने ८७५० या महत्त्वाच्या पातळ्या त्यागून घसरगुंडी दाखविली होती. तथापि, आर्थिक सुधारणांच्या धडाका, सार्वजनिक गुंतवणुकीतील वाढीतून उमद्या अर्थवृद्धीचा आशावाद दाखविणाऱ्या आर्थिक सर्वेक्षणाने बाजाराचा मूडपालटास मोठा हातभार लावला.
चौफेर खरेदीला बहर आल्याने, बाजारात सर्वच निर्देशांकांमध्ये जोमदार सरशी दिसून आली. गेल्या काही दिवसांत डचमळलेल्या बँकिंग निर्देशांकाने चांगली कमाई केली. आघाडीच्या समभागांसह स्मॉल आणि मिड कॅप या मधल्या फळीतील समभागांतही उमदी खरेदी होताना दिसून आले. निफ्टीने शुक्रवारच्या व्यवहारात तब्बल १६०.७५ अंशांची भर घालत ८८५० नजीक म्हणजे ८,८४४.६० अंशांवर विश्राम घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सेबी’कडून दक्षतेचे फर्मान
अर्थसंकल्पदिनी शेअर बाजारात शनिवार (सुटीचा दिवस) असतानाही व्यवहार खुले राहणार आहेत, मात्र अशा प्रसंगांना बाजाराची संवेदनशीलता पाहता वादळी वध-घटीचा प्रत्ययही अनुभवास येतो. या पाश्र्वभूमीवर भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने करडय़ा दक्षतेची काळजी घेण्यास एनएसई आणि बीएसई या दोन्ही बाजारांना सूचित केले आहे. बाजारातील अस्वस्थता दिसलीच तर तिचा गैरफायदा कुणाकडून घेतला जाऊ नये आणि दिवसभर सुरळीत व्यवहार सुरू राहावेत, याला प्राधान्य देण्यात आले आहेत.

अर्थसंकल्पही सुधारणांना पूरक असावा..
देशातील विद्यमान आर्थिक पर्यावरण हे मोठय़ा भरारीसाठी आजच्या इतके कधीही अनुकूल नव्हते. सर्वेक्षणाने सूचित केले त्या भारत अशा मधुर वळणावर आहे, ज्याने दमदार आर्थिक सुधारणांसाठी सुलभ नेपथ्यरचना केली आहे.. या सुधारणांच्या दिशेने खरोखरच पाऊल पडत आहे अशी अपेक्षा उद्याच्या अर्थसंकल्पातून निश्चित करता येईल.
देवांग मेहता, वरिष्ठ उपाध्यक्ष, आनंद राठी फायनान्शियल सव्‍‌र्हिसेस

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex logs best gain in 6 weeks after economic survey boosts budget hopes
First published on: 28-02-2015 at 01:47 IST