गेल्या चार महिन्यांतील तळातून निर्देशांकांना बाहेर काढणाऱ्या भांडवली बाजाराच्या उभारीला मंगळवारी नफेखोरीने चाप लावला. मात्र तेजीवाल्यांचा निग्रहापायी त्याला फार मोठय़ा प्रमाणात यश आले नाही. 

मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक -सेन्सेक्स आठवडय़ातील दुसऱ्या सत्रात अर्धशतकी घसरण नोंदवित स्थिरावला. मात्र दिवसभर तेजी-मंदीवाल्यांच्या धुमश्चक्रीने निर्देशांकाचा प्रवास अस्वस्थच राहिला.
सत्रात २७,६०३.७१ पर्यंत झेप घेणारा सेन्सेक्स दिवसअखेर ५०.४५ अंशांनी घसरला. व्यवहार बंद होताना तो २७,४४०.१४ वर स्थिरावला. मुंबई निर्देशांक व्यवहारात त्याच्या सत्रातील उच्चांकापासून १५० अंश खाली होता. तर सत्रात ८,३५५.६५ ते ८,२८०.६० प्रवास करणारा निफ्टी दिवसअखेर ७.१५ अंश घसरणीने ८,३२४.८० वर थांबला. सेन्सेक्समधील एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयटीसी, स्टेट बँक, महिंद्र अॅन्ड महिंद्र, सिप्ला यांच्या समभागांवर विक्रीचा दबाव जाणवला. तर ओएनजीसी, वेदान्ता, हिंदुस्थान युनिलिव्हर, टाटा स्टील, सन फार्मामध्ये खरेदी अनुभवली गेली. मिड व स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ०.६० व ०.०८ टक्क्यांनी वाढले.