मुंबई : जगभरातील भांडवली बाजारातील सकारात्मकतेने विदेशी गुंतवणुकीचा वाढलेला ओघ आणि देशांतर्गत ऑक्टोबरच्या चलनवाढीच्या दिलासादायक आकडेवारीने मंगळवारी स्थानिक बाजारात प्रमुख निर्देशांक ‘सेन्सेक्स’ला नवीन सार्वकालिक उच्चांकावर चढाईचे स्फुरण मिळवून दिले. चढ-उताराच्या हिंदोळे सुरू राहिलेल्या मंगळवारच्या सत्राच्या शेवटच्या तासाभराच्या व्यवहारावर तेजीवाल्यांनी वर्चस्व स्थापित केले आणि परिणामी मुंबई शेअर बाजाराच्या ‘सेन्सेक्स’ने २४८.८४ अंशांची (०.४० टक्के) कमाई करून ६१,८७२.९९ हे नवीन शिखर गाठता आले. अलीकडेच, ११ नोव्हेंबरला स्थापण्यात आलेली ६१,७९५.०४ ही उच्चांकी पातळी यातून मागे टाकली गेली. दिवसभरात हा निर्देशांक ५१९ अंशांच्या फरकाने वर खाली होत राहिला आणि ६१,९५५.९६ हा त्याचा उच्चांक आणि ६१,४३६.९०चा नीचांक त्याने नोंदविला. बरोबरीने, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक ७४.२५ अंशांनी (०.४१ टक्के) वाढून १८,४०३.४० वर दिवसअखेरीस स्थिरावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सेन्सेक्समधील पॉवर ग्रिड, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, स्टेट बँक, डॉ रेड्डीज आणि एशियन पेंट्स हे समभाग प्रामुख्याने वधारले. त्या उलट आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसव्‍‌र्ह आणि नेस्ले हे समभाग गडगडले. सोमवारी अमेरिकेतील बाजारांचा प्रवास नकारात्मक राहिला. तथापि मंगळवारच्या व्यवहारात आशियातील सोल (कोरिया), टोक्यो (जपान), शांघाय (चीन) आणि हाँगकाँगमधील बाजार वाढ नोंदवून बंद झाले. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १७ पैशांनी मजबुती मिळविणाऱ्या रुपयाच्या मूल्यानेही गुंतवणूकदारांमध्ये खरेदीपूरक उत्साह निर्माण केला. सोमवारप्रमाणे मंगळवारच्या व्यवहारातही विदेशी संस्थागत गुंतवणूकदार बाजारात निव्वळ खरेदीदार राहिले. बाजाराकडे उपलब्ध तपशिलानुसार, सोमवारी त्यांनी १,०८९.४१ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sensex nifty also advanced 18400 capital markets around world foreign investment ysh
First published on: 16-11-2022 at 00:02 IST