बाजार नव्या शिखरावर

भारतीय बाजारात तेजीवाल्यांनी सरशी साधत संपूर्ण वरचष्मा कायम राखला आहे.

‘सेन्सेक्स’कडून ५८ हजारही सर;‘निफ्टी’ही अभूतपूर्व १७,३०० पुढे

मुंबई : भारतीय भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी सप्ताहाची सांगता करताना पुन्हा एकदा नवीन शिखरावर चढाई केली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स पहिल्यांदाच ५८,००० हजार या ऐतिहासिक पातळीवर स्थिरावला, तर निफ्टीने १७,३०० ची पातळी लीलया पार केली.

अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांच्या दिलासादायी वक्तव्याच्या परिणामी जगातील सर्वच प्रमुख बाजारांमध्ये हर्षोल्हासाचे वातावरण आहे. त्याच्याच परिणामी भारतीय बाजारात तेजीवाल्यांनी सरशी साधत संपूर्ण वरचष्मा कायम राखला आहे.

अथकपणे विक्रमी दौड असलेल्या भांडवली बाजारात शुक्रवारी सेन्सेक्स २७७.४१ अंशांनी वधारून इतिहासात पहिल्यांदाच ५८ हजारांपार, ५८,१२९.९५ पातळीवर बंद झाला. दिवसभरात सेन्सेक्सने ५८,१९४.७९ अंशांची सार्वकालिक उच्चांकालाही गवसणी घातली. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकानेही ८९.४५ अंशांची कमाई करीत १७,३२३.६० पातळीवर विसावा घेतला. निफ्टीने दिवसभरात १७,३४०.१० अंशांची सर्वोच्च पातळी गाठली.

निर्देशांकांमध्ये स्थान असणाऱ्या बड्या, मातबर समभागांमध्ये एकवटलेल्या खरेदीचा परिणाम म्हणून सेन्सेक्स आणि निफ्टीची नवनवीन उच्चांक गाठणारी उसळी दिसत आहे. शुक्रवारच्या व्यवहारातही रिलायन्स इंडस्ट्रीजचा समभाग चार टक्के वाढीसह सर्वाधिक तेजीत होता. त्यापाठोपाठ टायटन, टाटा स्टील, बजाज ऑटो, मारुती आणि डॉ. रेड्डीजच्या समभागात तेजी राहिली. मात्र हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, एचडीएफसी आणि इंडसइंड बँकेच्या समभागात घसरण झाली.

क्षेत्रीय पातळीवर वित्तीय सेवा आणि ग्राहकोपयोगी उत्पादने वगळता बहुतेक सर्व प्रमुख क्षेत्रीय निर्देशांक सकारात्मक पातळीवर स्थिरावले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये खरेदीचा जोर कायम होता. तसेच अस्थिरता निर्देशांकही दोन टक्क्यांनी वाढला.

देशांतर्गत बाजारात धातू आणि वाहन उत्पादक कंपन्यांच्या समभागांमधील मागणीचा बहर आणि निर्देशांकामध्ये सर्वात मोठे स्थान असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांतील दमदार उसळीमुळे बाजार तेजीला बळ मिळाले.

’   बिनोद मोदी, मुख्य रणनीतीकार, रिलायन्स सिक्युरिटीज

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sensex nifty index share market akp

ताज्या बातम्या